Pune News : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’चा जाहीरनामा प्रसिद्ध करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित पवारांचे नाव, छायाचित्र आणि आवाज असलेले व्हिडिओ परवानगीशिवाय प्रचारासाठी वापरल्याने जगताप यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जय पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी पुरुषोत्तम जगताप यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. पण, अजितदादांचे नाव आणि छायाचित्र परवानगीशिवाय वापरू नये, असे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, काल त्यांनी सुनेत्रावहिनींचा व्हिडिओ वापरून आपल्या पॅनेलचा प्रचार केला. त्यामुळे पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे जय पवार यांनी सांगितले.
जगताप यांनी अजित पवारांचा आवाज असलेला व्हिडिओही वापरल्याचा दावा करत त्याबाबतही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेमकी कोणती कारवाई केली जाणार, याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही जय पवार यांनी सांगितले. मात्र, जगताप यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या इतर व्यक्तींवर कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीपासूनच वेगळा प्लॅन असावा
सोमेश्वरच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीला पुरुषोत्तम जगताप हेच जबाबदार असल्याचा आरोप जय पवार यांनी केला. “ही परिस्थिती एका व्यक्तीमुळे निर्माण झाली आहे. हे सर्व जगताप यांच्यामुळे झाले आहे,” असे ते म्हणाले. पॅनेल निश्चित करण्यापूर्वी जगताप यांच्यासोबत चर्चा झाल्याचा दावा जय पवार यांनी केला.
ते म्हणाले, २८ तारखेला पुरुषोत्तम जगताप आमच्याकडे आले आणि त्यांनी १६ नावे दिली. या नावांबाबत आम्ही सुनेत्रावहिनींसोबत चर्चा केली. त्यानंतर २९ तारखेला रात्री साधारण दोन वाजता ते आमच्याकडे आले. त्यावेळी सुनेत्रावहिनीही उपस्थित होत्या. त्यानंतर नवीन पॅनेल तयार करून अंतिम करण्यात आले. सध्या पुरुषोत्तम जगताप यांचे दौरे आणि प्रचाराची पद्धत पाहता, त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळा प्लॅन असावा, असा दावा जय पवार यांनी केला.
‘कारखाना अजितदादांच्या कार्यपद्धतीने चालवणार’
सोमेश्वर कारखाना अजित पवार यांच्या कार्यपद्धतीने चालवण्याचा दावा करत जय पवार यांनी निवडणुकीत कोणताही राजकीय स्वार्थ नसल्याचे सांगितले. अजितदादांनी अनेक वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. त्याच कार्यपद्धतीने सोमेश्वर कारखाना चालवला जाईल. यामध्ये कोणताही राजकीय स्वार्थ नाही. आमचे लक्ष कारखाना योग्य पद्धतीने चालवण्यावर आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या सहभागावर काय म्हणाले?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत भाजपचा सहभाग असल्याबाबत विचारले असता जय पवार यांनी हा मुद्दा फेटाळून लावला. ही कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक नाही. त्यामुळे याकडे त्या पद्धतीने पाहिले जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. आपले पॅनेल सर्वसमावेशक असल्याचा दावा करताना त्यांनी उमेश पाटील यांची या पॅनेलच्या निर्मितीत कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पॅनेल तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दादांवरील प्रेम अजूनही कायम
सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांच्यावरील जनतेचे प्रेम दिसून येत असल्याचा दावा जय पवार यांनी केला. सध्याचा प्रचार पाहिला तर प्रत्येक ठिकाणी दादांवरील जनतेचे प्रेम दिसत आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षाही यावेळी अधिक लोक प्रचारात सहभागी होत आहेत. सर्वत्र लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत आहे,” असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत अनेकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला असला, तरी त्याचवेळी हेच लोक आपल्यासोबतही असल्याचे जय पवार यांनी नमूद केले. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत आता कारखान्याच्या विकासाच्या मुद्द्याबरोबरच अजित पवारांचे नाव, नेतृत्व आणि पक्षातील निष्ठेचा मुद्दाही केंद्रस्थानी आल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.