Pasha Patel
Pasha Patel Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'सोयाबीन उत्पादक मोदी सरकारवर खूष आहेत'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतात सोयाबीन आयात बंद आहे. देशात सोयाबीन आयात करावी अशी मागणी कुक्कुटपालन व्यवसायिकांनी केली होती. या मागणीला भारतीय जनता पक्षाचे ( BJP ) नेते तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल ( Pasha Patel ) यांनी विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. 'Soybean growers happy with Modi government'

पाशा पटेल म्हणाले, देशांतर्गत बाजारपेठेत मुबलक सोया पेंड शिल्लक असल्याने यावर्षी सोयाबीन पेंड आयात न करण्याचा निर्णय मोदी सरकारने नुकताच घेतला आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्रातील शेतकरी मोदी सरकारला धन्यवाद देत आहेत. कुक्कुटपालन व्यावसायिक सोयाबीन पेंडीची आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करत आहेत, असे समजल्यावर आम्ही दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीच्या आकडेवारी द्वारे सोयाबीन पेंडीच्या आयातीची मागणी करत आहेत. ही मागणी मान्य करू नका, असे निवेदन आम्ही गोयल यांना दिले.

ते पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोयल यांना व वाणिज्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोयाबीन पेंडीच्या आयातीची मागणी मान्य करू नका असे सांगितले. देशांतर्गत बाजारपेठेत 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन पेंड शिल्लक असतानाही कुक्कुटपालन व्यावसायिक चुकीची आकडेवारी सादर करत आहेत. देशांतर्गत उपलब्धतेचा अंदाज घेऊन मंत्री पीयूष गोयल यांनी सोयाबीन पेंडीच्या आयातीचा विचार नसल्याचे जाहीर केले.

मागील वर्षी जून मध्ये देशात सोयाबीन पेंडीचा तुटवडा निर्माण झाला होता . त्यामुळे त्यावेळी कुक्कुटपालन व्यावसायिकांनी पेंडीच्या आयातीची मागणी केल्यावर शेतकऱ्यांनी या मागणीला विरोध केला नाही. मात्र जूनमध्ये आयातीचा निर्णय झाल्यावर ही सोया पेंड देशात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आली त्यावेळी देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनची आवक सुरू झाली होती. आयात पेंडीमुळे सोयाबीनच्या भावात घसरण झाली. सध्या देशात भरपूर सोया पेंड शिल्लक असल्याने आयातीची गरजच नाही, असेही पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले की, सोया पेंड आयात न करण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य केल्याबद्दल शेतकरी वर्ग मोदी सरकारला धन्यवाद देत आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वाढून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या पुढील काळात कुक्कुटपालन व्यावसायिकांनी चुकीची आकडेवारी सादर केल्यास त्याला विरोध करू, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT