Solapur, 03 March : सोलापूर महापालिका निवडणुकीत 102 पैकी तब्बल 87 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणारा भारतीय जनता पक्ष स्थायी समिती सभापतिपदी कोणाला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. महापौरपद हे आमदार देवेंद्र कोठे गटाकडे गेले, तर उपहापौर हे आमदार सुभाष देशमुख यांना मानणाऱ्या ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडे गेले आहे, त्यामुळे तिजोरीच्या चाव्या माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघाकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, शहर उत्तर आणि सामाजिक फॅक्टरचा बॅलन्स साधताना ते रंजिता चाकोते किंवा अविनाश पाटील यांच्याकडे देऊन देशमुखांना चेकमेट करण्याची खेळी भाजपकडून खेळी जाऊ शकते.
स्थायी समिती सभापती निवडीसाठी येत्या शुक्रवारी (ता. ६ मार्च) सकाळी निवड होणार आहे. सभापतीपदासाठी उद्या (ता. ४ मार्च) दुपारी दीडपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, त्यामुळे सभापती कोण होणार, हे उद्याच निश्चित होणार आहे. त्याची औपचारिक निवड प्रक्रिया ही शुक्रवारी होणार आहे.
सोलापूर महापालिकेत तब्बल आठ वर्षांनंतर स्थायी समितीचा सभापती निवडला जाणार आहे. सभापतिपदासाठी भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. महापौरपद हे पद्मशाली समाजाला देण्यात आले आहे, तर उपमहापौरपद हे मराठा समाजाकडे देण्यात आलेले आहे, त्यामुळे शहरातील प्रभावशाली असलेल्या लिंगायत समाजाकडे स्थायी समितीचे सभापतीपद जाण्याची शक्यता आहे.
स्थायी समिती सभापतिपदासाठी अविनाश पाटील, रंजिता चाकोते, राजकुमार पाटील, अमर पुदाले यांची नावे चर्चेत आहेत. ही सर्व नावे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मतदारसंघातील आहेत. मात्र, देशमुख गटालाच स्थायी समितीचे सभापतीपद मिळणार की शहर उत्तरमधील इतर नगरसेवकांकडे तिजोरीच्या चाव्या जाणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
सभापतिपदासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटातून राजकुमार पाटील, अमर पुदाले ही दोन नावे आघाडीवर आहेत. परंतु महापौर, सभागृह नेतेपदी ओबीसींना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे देशमुख गटाच्या या दोन ओबीसी नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे याच मतदारसंघातील पण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे रंजिता चाकोते यांना संधी मिळू शकते. त्याचबरोबर अविनाश पाटील यांनाही संधी मिळू शकते.
हे सोळा नगरसेवक स्टॅडिंंगचे सदस्य
सोलापूर महापालिकेच्या २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या सोळा सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात भाजपकडून राजकुमार पाटील, अविनाश पाटील, रंजिता चाकोते, अमर पुदाले, गणेश वानकर, सतीश सिरसीला, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम यांना संधी दिली आहे. एमआयएमकडून अझहर हुंडेकरी आणि शिवसेनेकडून अमोल शिंदे हे स्थायी समितीवर निवडले गेले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.