<div class="paragraphs"><p>Shripatrao Shinde</p></div>

Shripatrao Shinde

 

sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

स्वतःची इस्टेट पणाला लावू; पण शेतकऱ्यांना ऊसबिल देऊ

सरकारनामा ब्यूरो

गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) : गोडसाखर सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असताना तो सुरु होणार नाही, असे विरोधक सांगत होते. तरीही प्रयत्नांना यश येवून कारखाना सुरु झाल्यावर आता ऊस (Sugarcane) बिलासाठी पैसे कोठून आणणार, असे ते विचारत आहेत. नियमानुसार पंधरा दिवसांच्या आत ऊस बिले शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले आहे. प्रसंगी कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्नांत असणाऱ्या माझ्यासह १२ संचालक आपापली इस्टेट पणाला लावतील; पण शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ठोस ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी दिली. (Sugarcane bill will be paid to farmers on time: Shripatrao Shinde)

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी आज (ता. २८ डिसेंबर) ॲड शिंदे हे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. माजी आमदार प्रा. शरद पाटील, सुश्मिता राजेश पाटील, नगराध्यक्षा स्वाती कोरी, रामाप्पा करिगार यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, ‘‘शेतकरी, विविध संस्था, कामगारांच्या पाठबळाने हा कारखाना सुरु झाला आहे. विक्रमी कमी खर्चात मशिनरींची कामे करुन घेतली. सहकार मंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीस चेअरमन व एमडींना निमंत्रण असताना काही जण त्यात बेकायदेशीर घुसले. कारखान्याच्या विधायकतेसाठी घुसले असते तर, तेही आम्ही मान्य केलो असतो. परंतु, कारखाना मोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या पाठीमागे कोणत्या शक्ती होत्या त्याचा सभासदांनी विचार करावा. शेअर भांडवल वाढीसाठी पुढची दोन वर्षे शेतकऱ्यांचा एक रुपयाही कापणार नाही.’’

प्रा. पाटील म्हणाले, ‘‘कारखान्याच्या इतिहासातील हा दिवस सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. शेतकरी विकासाचे हे केंद्र सुरु व्हावे म्हणून दाखविलेली एकजूट कौतुकास्पद आहे. शेतकरी, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्यासाठी पुढे केलेला मदतीचा हात राज्याच्या सहकारातील दुर्मिळ असून तो सहकाराच्या दृष्टीने आशेचा किरण ठरणारा आहे. विविध घटकांच्या समर्पणातून सुरु झालेला हा कारखाना सहकाराला आदर्श ठरेल.’’

उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी प्रास्ताविक केले. रामाप्पा करिगार, संचालक प्रकाश चव्हाण, संचालक अमरसिंह चव्हाण, विश्‍वास खोत यांची भाषणे झाली. बाळासाहेब मुल्ला व प्रकाश पताडे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराव सावंत यांनी आभार मानले. संचालक, नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या वेळी कारखान्याला अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था चालकांसह कारखाना सुरु करण्यास प्रयत्न केलेल्या संचालकांचा सत्कार झाला.

एकरकमी २९०० रुपये एफआरपी देणार

अ‍ॅड. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्याची घोषणा करत असताना कारखान्याची एफआरपी २८८५ रुपये असून उत्पादकांना २९०० रुपयांची एकरक्कमी उचल देण्याचे जाहीर केल्यानंतर टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद मिळाला.

भविष्यात अभद्र युती...

अ‍ॅड. शिंदे म्हणाले, ‘‘कारखाना सुरु करण्याच्या बाजूने पांडव तर बंद पडावा म्हणून कौरव होते. कौरवांची संख्या मोठी आणि सामर्थ्यशाली असली तरी पुराणकाळात पांडवांचाच विजय झाला आहे. गोडसाखरबाबतही पांडवच विजयी होतील. कारखाना बंद पडला तर अध्यक्ष-उपाध्यक्ष जबाबदार राहतील, अशी दोन निवेदने डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी कारखान्याला दिली. यावरुन भविष्यात कोणती अभद्र युती समोर येणार, हे सभासदांनीच ओळखावे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT