Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed
Bjp Mla Suresh Dhas News Ashti-Beed Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सुरेश धस म्हणाले, पुन्हा विधानपरिषद निवडणूक लढणार नाही

अमित आवारी

अहमदनगर - हिवरे बाजार ( ता. नगर ) येथे सरपंच परिषद मुंबईतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी बोलताना विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी विधानपरिषद व सरपंच पदाची निवडणूक कठीण असल्याचे सांगितले. ( Suresh Dhas said that he will not contest the Assembly elections again )

या पुरस्कार वितरण सोहळ्याला पोपटराव पवार, आमदार प्रशांत बंब, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके, अंमलबजावणी संचालनालयाचे सहआयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार सुरेश धस म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्वसामान्य घरातील असामान्य काम करणाऱ्या, पायात चप्पलही नसणाऱ्यांनाही पद्मभूषण व पद्मश्री सारखे पुरस्कार मिळाले. केंद्र सरकारने त्यांची दखल घेतली. पोपटराव पवार यांनाही पद्मश्री सहजासहजी मिळाला नाही. त्यांनाही संघर्ष करावा लागला. आपल्या देशात काम न करणाऱ्यांचे कौतुक होते. काम करणाऱ्यांची चूक शोधायची आणि त्यावर बोट ठेवून आरोप केले जातात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात प्रत्येक क्षेत्रात 10 टक्के कीड लागलेले लोक असतातच. राजकारणात पाच-दहा टक्के वाईट लोक आहेत. मात्र आम्हा राजकारणी लोकांची जाहिरात जास्त झाली आहे. राजकारण्याची दाक्षिणात्य व्हिलन सारखी प्रतिमा तयार केली गेली आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी नागरिक आल्यावर नेत्यांना नाही म्हणायला सांगितले होते व अधिकाऱ्यांना हो म्हणायला सांगितले होते. मात्र उलटे घडत आहे. राजकीय व्यक्तींकडे लोक निवेदन घेऊ गेले की राजकीय व्यक्ती पत्र देता. आम्ही 'पाठ' 'पुरावा' करू. ग्रामपंचायतीतील एक सदस्यही ज्याच्या बाजूने नसलेलाही सरपंच स्वतःच्या हुशारीवर कोठूनही निधी आणू शकतो. अशी उदाहरणे मला माहिती आहेत.

मी तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलो. एकदा हरलो म्हणून विधानपरिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढविली. तीन वर्षे झाले विधानपरिषदेचा आमदार आहे. मात्र पुन्हा कोणी म्हंटले तरी मी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढणार नाही. पुन्हा विधानपरिषदेचा आमदार होणार नाही. ही निवडणूक लढायला खूप पैसा लागतो. माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या ते आवाक्या बाहेर आहे. मी ज्याच्या विरोधात निवडणूक लढविली त्याची मिळकत 174 कोटीची आणि माझी प्रॉपर्टी अवघी तीन कोटीची होती. हे प्रत्येक वेळी शक्य होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरपंचांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी आम्ही करू, असेही आमदार धस यांनी सांगितले.

तर मास्तर सरपंचांना पाडतील

आमदार प्रशांत बंब यांनी त्यांच्या भाषणात शासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना काम करत असलेल्या गावात सक्तीने रहायला लावावे असे आवाहन केले होते. यावर आमदार सुरेश धस म्हणाले, देशात निधीच्या गाडग्यांची उलटी उतरंड आहे. सर्वात वरती खासदार मग आमदार असे करत सर्वात शेवटी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे ग्रामीण विकास होत नाही. बंब यांनी सांगितल्या प्रमाणे जर सरपंचांनी सक्तीने मास्तरांना गावात रहायला लावले तर मास्तर सरपंच, उपसरपंचांना निवडणुकीत पाडतील, अशी कोपरखळीही आमदार धस यांनी मारली.

लंकेकडे पावर

कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती नरहरी झिरवळ हे अनुपस्थित होते. आमदार नीलेश लंकेही उशिरा आले. यावर आमदार सुरेश धस म्हणाले, आमदार नीलेश लंके हे सत्तेत असल्याने त्यांच्याकडे पावर आहे. त्यामुळे ते उशिरा येतात. राज्याचे ग्रामविकास मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ या कार्यक्रमाला का आले नाही हे कळत नाही, असा टोलाही आमदार धस यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT