Sushil Kumar Shinde, Sharad pawar Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sushilkumar Shinde :'यशवंतरावांपेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरद पवारांची' ; सुशीलकुमार शिंदेंकडून जाहीर कौतुक!

Sushil Kumar Shinde on Sharad Pawar : 'शरद पवारांनीच मला राजकारणात आणलं नाहीतर माझी काय हिंमत होती.' असंही सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Sushil Kumar Shinde Akluj speech माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज येथे सत्कारसमारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सुशीलकमार शिंदे यांनी शरद पवारांचं जाहीरपणे कौतुक केलं. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, मला राजकारणात आणण्यास शरद पवारच कारणीभूत असल्याचंही सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar), खासदार शाहू छत्रपती, विजयसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, खासदार प्रणिती शिंदे, खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार निलेश लंके, आमदार जयंत पाटील, रणजीतसिंह मोहिते पाटील आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.

सुशीलकुमार शिंदे(SushilKumar Shinde) भाषणात म्हणाले, 'शरद पवारांनीच मला राजकारणात आणलं नाहीतर माझी काय हिंमत होती. मला त्यांनी विचारलं होतं तू राजकारणात का येत नाहीस, तेव्हा मी म्हणालो होतो की मी जरुर येणार आहे, परंतु योग्य परिस्थिती आल्यानंतर. तर त्यांनी लगेच म्हटलं की योग्य परिस्थिती आली आहे तू नोकरीचा राजीनामा दे आणि त्याच दिवशी ठरलं की मी राजकारणात यावं.'

याशिवाय, 'मला घडवण्यात शरद पवार शेवटपर्यंत आहेत. एक घटना अशी झाली की, तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की, दो हंसो का जोडा. मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो. एकदिवशी दुपारी चार-पाच वाजेच्या सुमारास विलासरावांनी एक कागद आणला आणि सही करा असं म्हणाले, मी मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता, की मुख्यमंत्री शरद पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बसवा. मी तिथे फसलो होतो.'

'पण शरद पवारांना अखेरपर्यंत ते काही खरं वाटत नव्हतं. सुशीलकुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा? पण मी मित्राकरता फसलो होतो. मी त्याची कबूली जाहीरपणाने दिली, बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं, आता माहिती नाही अलीकडील काळात. पण तरीही शरद पवारांनी मी मुख्यमंत्री व्हावं यासाठी नरसिंहरावांसमोर सविस्तर माहिती सादर केली.'

याचबरोबर 'एखाद्याला एवढं पुढे आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याला बरबाद करणं, हे शरद पवारांनी कधी केलं नाही. माझ्यावर तर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं. आम्ही सगळे आतापर्यंत म्हणत असू की यशवंतरावांची जी दृष्टी होती ती विशाल होती. मी तर म्हणेण की यशवंतरावांपेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरद पवारांची. म्हणून ते आज महाराष्ट्रात पडत्या पावसातही फिरतात, त्यांना कोणी सांगितलं असेल?' असंही सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवलं.

तसेच 'महाराष्ट्राला असा नेता मिळणार नाही. he is the first now in this genration and i think he is the last. शरदरावजी तुमचे किती गुण सांगावेत, आम्ही चुका करत गेलो तुम्हा आमच्या चुकांवर पांघरूण घालत गेलात आणि महाराष्ट्राला मोठं करत गेलात.' असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचे आभार व्यक्त केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT