Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘शहाजीबापू, वसंतदादा सूतगिरणी, राधाकृष्ण संघ, क्रेडीट सोसायटीचे काय झालं तेही सांगा’

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (जि. सोलापूर) : ‘दादा लाव रे व्हिडिओ, आज धुरळाच काढते...’ तेरा वर्षांपूर्वीचा 14 सेकंदांचा व्हिडिओ काढून माझी प्रतीकात्मक तिरडी बांधण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आजवर याविषयी अनेकांनी अक्षपार्ह विधाने केली, त्याबद्दल भाजप (BJP) काहीच कसे बोलत नाही. याबाबत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सभेत अनेक व्हिडिओ दाखवले. ना हिंदुत्वासाठी, ना निधीसाठी हे गेले स्वतःच्या स्वार्थी ५० खोक्यासाठी. ४० गद्दारदादांनी नियत बदलली, अशा शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे (Eknath Shinde) गटातील ४० आमदारांवर (MLA) टीकस्त्र सोडले. (Sushma Andhare's Sabha in Sangola : Criticism of MLA Shahaji Patil)

सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या सभेमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ‘सभेमधून मी जे प्रश्न विचारते आहे, त्यावर बोलण्यापेक्षा, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यापेक्षा भाजप मला अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु कायदा माझ्या बापाने लिहिला असल्यामुळे मी कधीच या जाळ्यात अडकू शकत नाही.

सुमारे १३ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पुढील मागील संदर्भ काढून हवे ते मजकूर सोशल मीडियावर भाजपद्वारे प्रसिद्ध केले जात आहे, असा आरोप करून या अगोदर रविशंकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले आक्षेपार्ह लिखाण, भिडे गुरुजींची बातमी, निवृत्ती महाराजांचे व इतरांची प्रवचने तसेच पंतप्रधान मोदी व इतर भाजप नेत्यांनी केलेली विधाने याबाबतचे व्हिडिओ सभेत दाखवत यावर भाजपचे नेते काहीच का बोलत नाहीत? असा सवालही अंधारे यांनी केला.

आज उद्योग गुजरातला, गाव कर्नाटकला तर नेते गुुवाहटीला जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही काय करायचं, यासाठी आज महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा करीत आहोत. भागवत संप्रदाय कधीही चमत्काराला थारा देत नाही. परंतु माझ्या विधानाचे चुकीचे अर्थ काढून माझ्यावर टीका केली जात आहे. राज्यपालपदाबद्दल मला आदर आहे. परंतु त्यांनी महाराष्ट्र आणि येथील महापुरुषांबद्दल केलेल्या विधानाचा मी निषेध व्यक्त करते, असेही अंधारे म्हणाल्या.

आमदार शहाजी पाटील यांच्याविषयी बोलताना अंधारे म्हणाले क्या, शहाजीबापू माझे दादा सत्तेसाठी नेहमी लाचारी करतात. सांगोला तालुक्यातील माझ्या या भावाने वसंतदादा सूतगिरणी, पतंगराव क्रेडिट सोसायटी, राधाकृष्ण संघ, एक कुटपालन आदी संस्थांचे काय झाले, या प्रश्नाची उत्तरे अगोदर द्यावीत. शहाजीबापू तालुक्याला निधी देत नाहीत; म्हणून मिंदे गटात गेल्याचे सांगतात. सांगोला तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचा व मरेपर्यंत शिवसेना सोडणार नसल्याचा शहाजी पाटील यांचा व्हिडिओ त्यांनी सभेत दाखविला. आज तालुक्याला टक्केवारीचे ग्रहणच लागले आहे, असाही आरोप अंधारे यांनी केला.

या महाप्रबोधन सभेत आमदार शहाजी पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी करताना (स्व.) गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्याविषयी व शेतकरी कामगार पक्षाच्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळाबद्दल बरेच बोलून गेल्या. शेवटी पत्रकारांनी या व्यासपीठावर शिवसेनेबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही शेकापबद्दल जास्त बोललात, असे विचारले असता मला शहाजी पाटील काय आहे, एवढंच सांगायचं होते. महाप्रबोधन यात्रा असून ही प्रचार सभा नसल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेत्या संजनाताई घाडी, सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके, शरद कोळी, तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, आयोद्या पोळ, पुनम अभंगराव, शहरप्रमुख कमरूद्धीन खतीब, भारत मोरे, सुभाष भोसले, सौरभ चव्हाण, तुषार इंगळे, गोरख येजगर, अरविंद पाटील, अस्लम मुलानी, नवल गाडे, शंकर मेटकरी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. तुषार इंगळे, जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर संभाजी शिंदे यांनी प्रस्ताविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT