Ahmednagar Swabhimani Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Swabhimani Sanghtna : साखर कारखानदारांच्या घरावर 'ढोल बजाओ!' ३१०० रुपये दरासाठी स्वाभिमानी आक्रमक

राजेंद्र त्रिमुखे

Ahemednagar Political News : साखर कारखानदारांनी गळीत हंगामापूर्वी उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये भाव घोषित करावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. जे भावाची घोषणा करणार नाहीत, त्या कारखानदारांच्या घरांवर ढोल बाजाओ आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा नगर स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला आहे. (Latest Political News)

अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पैठण येथे पार पडली. उसाचा गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये सुरू होणार आहे. मागील हंगामातील शेतकऱ्यांची केलेली कपात व वाढीव दराचा हप्ता शेतकऱ्यांना तत्काळ देण्यात यावा, तसेच येत्या गळीत हंगामातील उसाचा दर ३१०० रुपये प्रतिटन जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी आणि त्यासाठी पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

'मागील हंगामातील पैठणमधील आंदोलन अतिरिक्त उसामुळे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मागे घेण्यात आले होते. ते गुंडाळले असे समजू नका. या गळीत हंगामामध्ये आता लंगोट बांधून कोणाला यायचे ते येऊ द्या, आम्ही समर्थ आहोत,' असा इशारा साखर कारखान्यांना स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला आहे.

'या गळीत हंगामात उसाचा दर जाहीर करावा, या मागणीसाठी साखर कारखानदारांच्या घरावर राज्यभर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे,' असे जिल्हा अध्यक्ष राऊसाहेब लवांडे यांनी सांगितले. (Maharashtra Political News)

बैठकीला अहमदनगर जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे, छत्रपती संभाजीनगरचे युवा जिल्हा अध्यक्ष माऊली मुळे, शेवगाव तालुका अध्यक्ष मेजर अशोक भोसले, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, अमोल देवढे, दादा पाचरणे, तसेच शेवगाव-पैठण तालुक्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी २२ दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील आणि कर्नाटकातील साखर कारखान्यांवर ५२२ किलोमीटर चालून आत्मक्लेश करणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. यंदा स्वाभिमानी संघटनेची २२ वी ऊस परिषद ७ नोव्हेंबरला होणार आहे.

यापूर्वीच स्वाभिमानी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर साखरपट्ट्यात असणाऱ्या नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांसमोर स्वाभिमानीने हंगाम सुरू होण्यापूर्वी भाव घोषित करण्याचे आव्हान दिले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT