Aditya Thackeray-Dhairyashil Mane
Aditya Thackeray-Dhairyashil Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंविषयी बोलताना खासदार धैर्यशील मानेंचे डोळे पाणावले; पण...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविषयी बोलताना इचलकरंजीचे बंडखोर खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांचे डोळे पणावले. पण गेल्या अडीच वर्षांत पर्यावरणांसदर्भात मी सुचवलेल्या कामांपैकी फक्त एकच काम झाल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे धारेवरही धरले. दुसरीकडे, मी शिवसेना (Shivsena) नेतृत्वाच्या अंत्यत जवळ होतो, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञता माझ्या मनात आयुष्यभर राहणार आहे, अशा भावना खासदार माने यांनी बंडखोरीनंतर प्रथमच त्यासंदर्भात बोलताना व्यक्त केल्या. (Talking about Aditya Thackeray, MP Dhairyashil Mane's eyes watered; But...)

शिवसेनेतील बंडानंतर खासदार माने यांनी प्रथमच मीडियासमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना आदित्य ठाकरे हे जेव्हा बंडखोरीनंतर तुमच्या इचलकरंजी मदारसंघात गेले, त्यावेळी त्यांनी ‘इथल्या खासदारांना माझे मित्र मानत होतो. पण त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला’ अशी भावना व्यक्त केली होती. त्यावर उत्तर देताना माने यांचे दोन भाव पुढे आले.

खासदार माने म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी इचलकरंजी मतदारसंघात आल्यानंतर जे विधान केले. ते बरोबर आहे. ते निश्चितपणे माझे मित्र आहेत. ठाकरे कुटुंब हे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आदित्य ठाकरे यांनी वेळोवळी मला वेळ, कामे दिली. पण त्यांच्या कानावर आहे की नाही मला माहित नाही. माझ्या मतदारसंघात पर्यावरण मंत्रालयातसंदर्भाती मी सुचवलेली जी कामे होती, त्यातील एकच काम मार्गी लागलं. इतर कोणत्याही कामांना मान्यता मिळालेली नाही. त्यांनी प्रयत्न केले नाहीत, असं मी म्हणणार नाही. पण तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे त्यात निश्चितपणे काही अडचणी येत होत्या. हे प्रत्येक खासदारांच्या बाबतीत आहे. त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता. मात्र त्याला फायनल रिझल्ट येऊ शकला नाही, हे वस्तुस्थिती आहे. मित्र म्हणून आदित्य ठाकरे यांच्या माझ्याबाबतचा जो जिव्हाळा आहे, तो राजकारणापलीकडचा आहे. माझाही तसाच आंतरभाव आहे, हे सांगताना धैर्यशील माने यांचे डोळे पणावले.

गेल्या दोन-अडीच वर्षांत कोरोनाच्या काळात आम्हाला खासदार निधी मिळाला नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने राज्य सरकारकडून आम्हाला सर्वांना मदतीची अपेक्षा होती. आम्ही वारंवार निवेदने देऊन निधीची मागणी करत होतो. मात्र आम्हाला निधी मिळत नव्हता. आता भाजप-शिवसेना एकत्र आल्याने केंद्र सरकारचा फायदा मतदारसंघाला होईल, या एकमेव भावनेने आम्ही सर्व खासदार शिंदे गटाबरोबर गेलो आहेत, असेही माने यांनी नमूद केले.

खासदार माने म्हणाले की, मी, ओमराजे निंबाळकर हे कायम शिवसेना नेतृत्वाबरोबर काम करत होतो. आमच्या ज्या भावना आहेत, त्याच उद्धव ठाकरे यांच्याही आहेत. राजकीय दुरावा निर्माण झाला म्हणजे आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो, असे नाही. तेव्हाची परिस्थिती संपावी; म्हणून मी खासदारांच्या टीममध्ये काम करत होतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT