Anil Sawant-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Vidhan Sabha: पंढरपुरात आघाडीत बिघाडी; आरोग्य मंत्र्यांच्या पुतण्याला शरद पवारांकडून उमेदवारी

Sharad Pawar NCP: भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे गेल्या महिनाभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागत होते. सावंत यांच्यासोबत भगीरथ भालके, नागेश भोसले, वसंतराव देशमुख हे इच्छुक होते.

भारत नागणे/हुकूम मुलाणी

Pandharpur, 29 October : महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे चित्र पंढरपुरात दिसून येत आहे. काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सावंत यांना अकलूजमध्ये एबी फार्म दिला आहे.

महाविकास आघाडीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात (Pandharpur-Mangalvedha Constituency) काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी अर्ज भरला होता. मात्र, त्यांना एबी फार्म मिळाला नव्हता. पण, सोमवारी रात्री उशिरा माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये सावंतांना एबी फार्म दिला आहे.

भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत (Anil Sawant) हे गेल्या महिनाभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागत होते. सावंत यांच्यासोबत भगीरथ भालके, नागेश भोसले, वसंतराव देशमुख हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत जागा वाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

अनिल सावंत यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच आपण पंढरपूर मंगळवेढ्यातून अर्ज भरला आहे, असे सावंत सांगत होते. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सावंत यांना एबी फार्म देण्यात आला आहे. त्यात पंढरपूरची लढत चौरंगी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातही सावंत यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एबी फार्म देण्यात आल्याने आघाडीत बिघाडी होणार की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. आता पंढरपुरातून माघार कोण घेणार, याचीही चर्चा रंगली आहे.

पंढरपुरात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भगीरथ भालके यांना काँग्रेसची उमदेवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप धोत्रे यांना संधी देण्यात आलेली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत हे आता पंढरपूरच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पंढरपूर मतदारसंघाची लढत चौरंगी होणार की तिरंगी याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT