bribe Case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गब्बरसिंगला लाच घेताना पकडले...तो मोटारसायकल टाकून पळाला..पण शेवटी गाठलेच!

तासगावचे बीडीओ गब्बरसिंग गारळे याला लाच घेताना पकडले

सरकारनामा ब्यूरो

तासगाव (जि. सांगली) : तासगाव मंडल अधिकारी गब्बरसिंग तुकाराम गारळे याला भररस्त्यात आठ हजारांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मोटारसायकल टाकून पळून जात असताना लाचलुचपतच्या पथकाने थरारक पाठलाग करून पकडले. तासगाव महसूल विभागातील गेल्या चार महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. (Tasgaon BDO Gabbarsingh Garle was caught taking bribe)

तासगाव तालुक्यातील एका गावातील शेतकऱ्याला सोसायटीचे कर्ज मिळण्यासाठी सातबारा उताऱ्यावर ई कराराची नोंद करण्यासाठी तासगाव तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद होऊ नये, म्हणून मंडल अधिकारी तासगाव यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल झालेला होता. याची सुनावणी मंडल अधिकारी गब्बरसिंग तुकाराम गारळे (वय ३७, रा. वासुंबे, ता. तासगाव) याच्यासमोर सुरू होती. याचा निकाल तक्रारदार शेतकऱ्यांच्या बाजूने देण्यासाठी गारळे याने दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर ८ हजार रुपयांत निकाल देण्याचे गारळे यांनी मान्य केले.

दरम्यान, मंडल अधिकारी गारळे याने लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे दाखल करण्यात आली. तक्रारीची शहानिशा करून सापळा लावण्यात आला होता. तासगाव-सांगली रस्त्यावरील महाविद्यालय चौकात भर रस्त्यात आठ हजार रुपयांची लाच घेत असताना मंडल अधिकारी गारळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आपण पकडले असल्याचे लक्षात येताच गारळे याने बायपास रस्त्यावर पलायन केले. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. मात्र पोलिस जवळ आल्याचे पहाताच रस्त्यात मोटरसायकल तेथेच टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पळून जाणाऱ्या गब्बरसिंगला रस्त्याच्या बाजूच्या शेतात पकडण्यात आले. उशीरा तासगाव पोलिस ठाण्यात गारळे याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अंमलदार सलीम मकानदार, अविनाश सागर, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, सीमा माने, प्रीतम चौगुले यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT