Kolhapur, 19 October : कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महायुतीचे दोन मंत्री, दोन खासदार आणि १० आमदारांना अस्मान दाखवत पुन्हा एकदा बाजी मारली. चुरशीच्या लढतीत २१ पैकी १४ जागा जिंकत सतेज पाटील यांनी दुसऱ्यांदा सत्ता मिळविली. गोकुळच्या मैदानात महायुतीच्या मातब्बर डझनभर नेत्यांच्या विरोधात सतेज पाटलांनी एकहाती किल्ला लढवला आणि जिंकला. या निसटत्या विजयात शेवटच्या टप्प्यात बंटी पाटलांनी घातलेली भावनिक साद निवडणुकीला कलाटणी देणारी ठरली आहे, ते या विजयातून दिसून येत आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाची महायुती होती. या चार पक्षांच्या मातब्बर नेत्यांच्या विरोधात माजी मंत्री आमदार सतेज पाटील हे एकटे लढले. त्यांच्यासोबत राज्यस्तरावरील एकही नेता नव्हता. मात्र, सतेज पाटलांनी टाकलेल्या डावपेचापुढे महायुतीचे दोन मंत्री, दोन खासदार आणि १० आमदार हे बलाढ्य नेते निष्प्रभ ठरल्याचे दिसून येत आहे.
महायुतीत जागा वाटपावरून चार पक्षांमध्ये मतभेद झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागा वाटप करावे लागले होते. त्यातही शिवसेना आणि भाजपला झुकते माप मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज होते. जागा वाटपाच्या अंतर्गत संघर्षांचा महायुतीला फटका बसला.
निवडणुकीच्या आधी माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गोकुळच्या खासगीकरणाचा डाव असल्याचा बॉम्ब टाकला होता. तोही या निवडणुकीत महत्वाचा ठरल्याचे मानले जात आहे. याशिवाय गोकुळचा कारभार आता कोल्हापूरमधून नाही, तर मुंबईतून चालवला जाणार, हा मुद्दाही महत्वाचा ठरला आहे.
बंटी पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना भावनिक साद घातली होती. ‘मी एकटा आहे, तुमच्यासाठी मी एकटा लढतोय. गोकुळ दूध संघ टिकला पाहिजे, तो आपला आहे, अशी घातलेली भावनिक साद मतदारांना भावल्याचे निकालातून दिसून येत आहे.
याशिवाय देवांच्या शपथेचा मुद्दाही या निवडणुकीत महत्वाचा ठरला. अनेक नेत्यांनी एकमेकांवर शपथा घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या शपथेचा मुद्दाही प्रचारात गाजला.
तीन माजी अध्यक्ष, शौमिका महाडिकांना झटका
सतेज पाटील यांच्या झंझावातापुढे गोकुळच्या तीन माजी अध्यक्षांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये नवीद मुश्रीफ, अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय मागील निवडणुकीत एकमेव निवडून आलेल्या शौमिका महाडिक यांनाही यंदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.