कोल्हार ( जि. अहमदनगर ) - महावितरणकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुली करण्यात येत आहे. यासाठी रोहित्रे बंद केली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची भावना आहे. अशातच शेतकऱ्यांनी काल ( गुरुवारी ) महावितरण अधिकाऱ्यांनाच घेराव घालत आंदोलन केले. ( The farmers surrounded the MSEDCL officials )
थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणने रोहित्रे बंद केली आहेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथील उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना आज (गुरुवारी) घेराव घातला. अधिकाऱ्यांनी दहा फेब्रुवारीपर्यंत थकीत बिले भरण्याच्या अटीवर वीजपुरवठा सुरू केला.
थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणने कोल्हार खुर्द (ता. राहाता) वीज उपकेंद्राअंतर्गत गावांतील 25 रोहित्रांवरील सुमारे 300 ग्राहकांचा वीजपुरवठा पाच दिवसांपासून बंद ठेवला आहे. रोहित्रे बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे पिकांना पाणी देण्याचा व जनावरांना पिण्याचे पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही रोहित्रे सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
आज डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेश शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपकेंद्रातील अधिकाऱ्यांना घेराव घातला, तसेच रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला. प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक नितीन पानसरे यांनी, महावितरणच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. यावेळी थकीत वीजबिलाचा एक हप्ता दहा फेब्रुवारीपर्यंत व उर्वरित रक्कम मार्चअखेर भरण्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर (देवळाली प्रवरा) यांनी महावितरणच्या धोरणानुसारच रोहित्रे बंद ठेवण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. बिले न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशावरूनच रोहित्रे बंद ठेवण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी श्रीधर शिरसाठ, पोलिस पाटील सुभाष शिरसाठ, प्रभाकर जाधव, रवींद्र दळे, विजय मा. खर्डे, अर्जुन जाधव, रंगनाथ गाढे, सोपान शिरसाठ, गोपीनाथ दळे उपस्थित होते.
उपकेंद्राभोवती पोलिस बंदोबस्त
शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस उपनिरीक्षक एस. के. नाऱ्हेडा यांच्या मार्गदर्शनाखाली वीज उपकेंद्र परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.