Ramraje Nimbalkar, Kirit Somayya
Ramraje Nimbalkar, Kirit Somayya sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'महाविकास'ची घोटाळ्याची परंपरा; रामराजेंना नेमका कोणाचा तपास हवा...

किरण बोळे

फलटण शहर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दीड वर्षात घोटाळ्यांची परंपरा सुरु केली आहे. यामध्ये एका पाठोपाठ नेते, मंत्री घोटाळेबाज ठरले आहेत. यातील २४ घोटाळे आपण उघड केले असुन त्यात महाविकास आघाडीतील १८ नेत्यांची नावे आली आहेत, असा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच ईडी संदर्भात नेमका तपास कुणाचा व्हावा, असे तुम्हास वाटते असा थेट सवाल त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना केला आहे.

किरीट सोमय्या हे घोटाळे बाहेर काढणारे नेते अशी माझी प्रतिमा राज्यात होणे ही बाब दुर्दैवी आहे. ऐतिहासीक परंपरा व विचारांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात 'जिथं जिथं जावू, तीथे घोटाळा व जिथं हात टाकाल तिथं घोटाळा' ही अवस्था आहे. केवळ आमचेच घोटाळे काढतो यावर बोलण्यापेक्षा घोटाळ्यांबाबत आपण सादर केलेल्या कागदपत्रांना आव्हान का करीत नाही असा सवाल करुन सोमय्या म्हणाले, जर जनताच आमच्याकडे येऊन सांगत असेल तर जनतेच्या समस्यांना वाचा फोडणं हे आमचे कामच आहे.

जर मी अथवा भाजपच्या कुणीही घोटाळे केले असतील तर तुम्ही कारवाई का करीत नाही, असा सवाल सोमय्या यांनी केला. गेल्या दोन दिवसांपुर्वी आपण ईडीच्या चौकशीला घाबरत नाही, असे विधान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले होते. याबाबत त्यांना विचाले असता श्री. सोमय्या यांनी रामराजेंचा नामोल्लेख टाळत मी येणार म्हणून त्यांनी असे विधान केले असे असेल तर मला विचार करावा लागेल.

ईडी संदर्भात तपास व्हावा, तो कुणाचा व्हायला हवा, तुमच्या मनात असं काही आहे का, असा थेट सवाल सोमय्या यांनी केला. माझा प्रश्न आणि शब्द प्रत्येकात अर्थ आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी मी येथे येणार आहे म्हणून त्यांनी विधान केले असेल तर मी त्यांनाच सांगतो तुम्हीच लोकांना सांगावं ईडी संबंधी तपास व्हावा अस तुमच्या मनात काय आहे किंवा होतं का, असा सवालही त्यांनी केला.

उद्धव ठाकरेंचे दोन 'शहाणे'...!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे दोन शहाणे लोक आहेत. त्यातील पहिल्या संजय राऊतांनी ५५ लाखांचा चोरीचा माल परत केला ना. बडबड्या राऊतांनी ईडी कार्यालयात मागच्या दाराने जात रात्री बँकेचे पैसे परत केले. दुसरा शहाणा मिलिंद नार्वेकरच्या लक्षात आले की सोमय्यांनी त्याच्या अनधिकृत बंगला पाहिला, फोटो काढले, त्याची तक्रार आली. केंद्र सरकारच्या आलेल्या टीमने सांगितलय की तो अनधिकृत आहे. तेव्हा त्याने ते बांधकाम स्वतःहून तोडले. तोच शहाणपणा अजित पवारांनी उद्धव ठाकरेंकडून घ्यावा. तसेच जरंडेश्वर कारखाना कोणाचा हे जाहीर करावं म्हणजे माझं काम संपलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT