Flex against Nitin Gadkari
Flex against Nitin Gadkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गडकरींनाही मान खाली घालावी लागेल अशी या रस्त्याची कहाणी!

सरकारनामा ब्युरो

Nitin Gadakari News : अहमदनगर ते शिर्डी या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्ता झाली आहे. हा रस्ता सुमारे चार वर्षांपूर्वी राज्याच्या बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही. देशातील रस्ते अमेरिकेसारखे करणार असे सांगणाऱ्या केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांनाही शरमेने मान खाली घालावी लागेल अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. अशातच या रस्त्यावरील बंद टोल नाक्यावर लावलेला एक फलक राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.

शिर्डीचे साईबाबा हे जगात प्रसिद्ध आहेत. जगभरातून अनेक भाविक शिर्डीला येतात. यात पुणे, अहमदनगर मार्गे शिर्डीला जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दररोज हजारो भाविक शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात. या आठवड्यात सुट्ट्याची संख्या जास्त असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र अहमदनगर ते शिर्डी रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदार निघून गेल्याने रस्त्याचे दुरवस्ता झाली आहे. यातच पाऊस सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

2010मध्ये या रस्त्याचे काम झाले होते. मात्र हे काम निकृष्ट असल्याने ठेकेदार संस्थेने तयार केलेला टोलनाका मनसेने बंद पाडला होता. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी होत होती. यातच चार वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी नियुक्त ठेकेदार काम अर्धवट सोडून निघून गेला आहे. ठेकेदार का निघून गेला यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या आमदाराने टक्केवारी मागितल्याचा आरोप केला होता. तर अकोले येथील एका कार्यक्रमात आलेल्या नितीन गडकरी यांनी रस्त्याच्या कामासाठी माती उपसा करण्यास हरित लवादाने बंधने आणल्याचे कारण दिले होते. मागील आठवड्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनी या रस्त्याचे काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी गडकरींची भेट घेऊन चर्चाही केली होती.

या रस्त्याला प्रवासी त्रस्त झाले आहेत. अहमदनगर वरून संगमनेर, नाशिकला जाणारे अनेकजण आता आळेफाटा मार्गे दुरून प्रवास करणे पसंत करत आहेत. मात्र राहुरी, कोल्हार, राहाता, बाभळेश्वर व शिर्डीला जाण्यासाठी हाच एक मार्ग आहे. या रस्त्याची दुरवस्ता झालेली असतानाच केंद्रीय मंत्री गडकरी मात्र देशातील रस्ते अमेरिकेच्या तुलनेचे करण्याबाबत भाष्य करत आहेत. यावर संतप्त झालेल्या एका प्रवाशाने चक्क अहमदनगर ते शिर्डी महामार्गावरील देहरे गावाच्या हद्दीत असलेल्या टोलनाक्यावर एक फलक लावला.

या फलकावर म्हंटले आहे की, 'अहो गडकरी साहेब आपण भाषणामध्ये सांगता भारतामधले रस्ते अमेरिकेसारखे गुळगुळीत करणार. नगर-मनमाड रस्त्याचा ठेकेदार पळून गेला की पळून लावला.' यातून रस्त्याच्या बाबतची नाराजी प्रवाशाने व्यक्त केली आहे, की कोणी राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून हा फलक लावण्यात आला आहे, याबाबत सध्या राज्यभर उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT