Nana Patole
Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'नाना' पटेल असे बोला!

प्रकाश पाटील

अहमदनगर - प्रत्येक पक्षात मवाळ आणि आक्रमक चेहरे असतात हे मान्य. मात्र, प्रत्येक वेळी आक्रमकपणा दाखवून चालत नाही. म्हणूनच म्हणावे लागेल, ‘नाना, जरा दमानं घ्या!’ The task of putting Congress in another pit?

शिवराळ भाषा, कमरेखाली वार करणारी विधानं आणि पराकोटीच्या द्वेषाचे राजकारण, हे आजकाल भूषण मानले जात आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. खरं तर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे. ते आमदार, खासदार आणि मंत्रीही राहिले आहेत. त्यांनीच जर, ‘पंतप्रधानांना मी शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो’ असे विधान करणे नक्कीच शोभनीय नाही. त्यांनी याबाबत कितीही खुलासा करण्याचा प्रयत्न केला किंवा ‘तसे मला म्हणायचेच नव्हते,’ असे कितीही ओरडून सांगितले, तरी ते कोणालाही पटणारे नाही. पटोलेंचे कधीही समर्थन करता येणार नाही.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. आघाडीचा हा प्रयोग फार काळ टिकणार नाही, असे विरोधक म्हणत असले, तरी सरकार टिकून आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीरपणेच सांगितले होते, की हे सरकार सध्या तरी पडणार नाही. हे सगळं खरं असलं, तरी पटोले यांच्यासारखे नेते आपल्या वादग्रस्त विधानाने सरकारला अडचणीत आणत आहेत. त्यांचे हे काही पहिले वादग्रस्त विधान नाही. यापूर्वी त्यांनी विरोधकांना सोडा, सत्तेतील आघाडीच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्याचे काम केले आहे. आपण काही बोललं तर लोक आपल्या पाठीशी उभे राहतात, असे मुळात समजण्याचे काही कारण नाही. सत्ता येते-जाते; पण राजकारणातील सुसंस्कृतपणा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, हे मात्र नक्की ! उचलली जीभ लावली टाळ्याला, असे होत नाही. नेते नवा वाद निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशी विधाने करीत असतात.

आपल्याकडे वाचाळवीरांची काही कमी नाही. असे विधान करायचे, की चर्चा स्वत:भोवती फिरली पाहिजे. पटोलेंवर राहुल गांधींचा विश्‍वास आहे. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आहे. ते काहीही बोलू लागले तरी जनता ते सहन करेलच असे नाही. कॉँग्रेस देशातील सर्वांत जुना, जाणता पक्ष आहे. या पक्षाला इतिहास आहे. देशासाठी त्याग केलेले शेकडो नेते या पक्षात होऊन गेले. वसंतदादा पाटील, शंकराव चव्हाण, विलासराव देशमुख, ते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण अशा कितीतरी नेत्यांची नावे घेता येतील. कधीही त्यांनी मर्यादेचे उल्लंघन केले नाही. पक्षनिष्ठा जपत पक्षवाढीसाठी ते प्रयत्न करीत राहिले.

त्यांच्याअगोदर मंत्री बाळासाहेब थोरातही प्रदेशाध्यक्ष होते. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. मात्र, त्यांनी राजकारण करताना कधीही मर्यादेचे उल्लंघन केले नाही. पक्ष अडचणीत येणार नाही, विरोधकांना फायदा होईल असे विधान किंवा कोणताही निर्णय घेतला नाही, याबाबत त्यांचे कौतुकच केले पाहिजे.

हे झाले नानांचे

म्हणून भाजप, शिवसेना किंवा इतर पक्षांतील नेते धुतल्या तांदळासारखे आहेत असे मुळीच नाही. भाजपमध्ये तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाचाळवीर ढिगाने सापडतील. सोनिया गांधी असोत की राहुल गांधी, प्रियंका गांधी; त्यांच्याविषयी कोण काय बोलते, कशी निंदानालस्ती केली जाते, हे काही लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याने जे काही तारे तोडले आणि नंतर माफी मागितली, ती ताजीच घटना आहे. म्हणून शिवसेनेचे समर्थन होत नाही. शिवसेनेचा तर इतिहासच आहे अशी निंदानालस्ती करण्याचा. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक असोत, की कॉँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते. शिवसेनेने नेहमी आपल्या विरोधकांचा समाचार घेताना जी काही उधळण करायची आहे ती केली आहे. असो.

येथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की राज्यात विरोधी पक्ष भक्कम आहे. या पक्षाचे नेते देवेंद्र फडणीस हे फायरब्रँड नेते आहेत. शंभराहून अधिक आमदार आहेत. सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी कोणतेही विधान करताना त्याचे काय परिणाम होतील, याचा तरी विचार करायचा. याचा अर्थ भाजपवर टीका करायची नाही का? तर असे मुळीच नाही. मात्र पंतप्रधानांविषयी थेट असे विधान करणे योग्य नाही. पंतप्रधान हे लोकनियुक्त आहेत. जनेतेने त्यांना निवडून दिले आहे. जर काँग्रेसचा लोकशाहीवर विश्‍वास आहे, तर असली रस्त्यावरची भाषा वापरायची का, याचा विचार मुळात काँग्रेसच्या मंडळींनी करावा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT