BJP Malshiras Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

माळशिरसमधला विजय कुणा व्यक्तीचा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याचा मोहितेंना टोमणा

या निवडणुकीत भाजपाचा प्रभाव तालुक्यात जाणवला. मात्र, राष्ट्रवादी व त्यांचे नेते उत्तम जानकर यांचा प्रभाव कुठेच दिसला नाही, असे भाजपचे म्हणणे आहे.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : माळशिरसच्या नगरपंचायतीत मिळालेला विजय कोणा एका व्यक्तीचा नाही तर भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या सकारात्मक प्रतिमेचा विजय असल्याची भावना भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील (K.K. Patil) यांनी व्यक्त केली. हा विजय मोहिते पाटील घराण्याचा असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. त्या समर्थकांना टोमणा पाटील यांनी मोहिते पाटील यांचे नान घेता मारला आहे.

जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींचा निकाल बुवारी जाहीर झाला. माढा नगरपंचायत कॉंग्रेसने दणदणीत बहुमताने जिंकली तर वैरागमध्ये आमदार राजेंद्र राऊत व माजी मंत्री दिलीप सोपल यांना धूळ चारत राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांनी बाजी मारली.माळशिरस तालुक्यातील महाळुंग-श्रीपूर तसेच नातेपुते नगरपंचायतीत मोहिते-पाटील यांना मानणाऱ्या गटांनी सत्ता काबीज केली.मोहिते-पाटील समर्थक गट असल्याने या दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता येणार असली तरी भाजपाच्या पक्ष चिन्हावर लढलेल्या माळशिरस या एकमेव नगरपंचायतीत पक्षाच्या चिन्हावर लढून मोठे यश मिळाले आहे.

या संदर्भात बोलताना के.के.पाटील म्हणाले, ‘‘ महाळुंग-श्रीपूरमध्ये पक्षाचे पदाधिकारी असताना अपक्ष म्हणून लढणाऱ्या दोघांनाही पक्षाने निलंबित केले आहे.विशेष म्हणजे या दोघांचाही निवडणुकीत पराभव झाला.या दोन्ही उमेदवारांना अपक्ष म्हणून कुणी उभे केले हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. माळशिरस नगरपंचायतीत झालेल्या विजय हा भाजपाच्या विचारांचा विजय आहे.भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेमुळे माळशिरसकरांनी भाजपावर विश्‍वास दाखवला आहे.’’

या निवडणुकीत भाजपाचा प्रभाव तालुक्यात जाणवला. मात्र, राष्ट्रवादी व त्यांचे नेते उत्तम जानकर यांचा प्रभाव कुठेच दिसला नाही. त्यामुळे येत्या काळातदेखील तालुक्यात व जिल्ह्यात भाजपाची घौडदौड कायम राहणार असून संघटना अधिक मजबूत करण्याकडे आमचे विशेष लक्ष राहणार, असल्याचे पाटील यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात जिल्ह्यात संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही काम करू, असे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT