Satara, 25 July : जयकुमार गोरेंचं आणि माझं काही वैयक्तीक भांडण नाही. मीच सगळं करतो, असे त्यांच्या मनात आहे. पण देव करो आणि त्यांना सदबुद्धी देवो. त्यांनी मंत्री व्हावं, गरिबांसाठी काम करावं. सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करावा, एवढंच माझं त्यांना सांगणं आहे. माझं वय वाढलेले आहे, त्यामुळे माझा तेवढं तर सांगण्याचा अधिकार आहे, अशी काहींशी मवाळ भूमिका विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांंनी मंत्री जयकुमार गोरेंबाबत घेतल्याचे दिसून येते.
फलटण तालुक्यातील कोळकी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमात माजी सभापती नाईक निंबाळकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचे (Jaykumar Gore) नाव घेऊन त्यांच्यावर भाष्य केले. एरवी नाव न घेता गोरेंवर खरपूस शब्दांत समाचार घेणाऱ्या रामजराजेंनी त्यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) म्हणाले, मी कोणीशीही बोलू शकतो. राज्यात मला कोणचं उलट चालत नाही. काय होतंय माहिती नाही. पण देवाचे फासेच असं पडलेले. जयकुमार गोरे यांच्या मनात माझ्याविषयी जी अढी निर्माण झालेली आहे. त्या विषयी त्यांना सांगण्याचाही प्रयत्न केला. तेही योग्य वेळी सांगेन. आज मी काहीही बोलणार नाही. मला बोलायचंच नव्हतं. पण हे नको ते बोलून गेले, त्यामुळे माझं तोंड सुटलं.
मी माझ्या तोंडाला सेन्सॉरशिप लावलेली आहे पण, ती कधी उठेवन सांगता येत नाही. योग्य वेळी ती सेन्सॉरशीप उठेल आणि त्या वेळी सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे. मला भीती वाटते, ती पुढच्या राजकारणाची आणि भविष्याची, असेही त्यांनी विधान केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी मात्र रामराजेंनी कडक भूमिका मांडली. ते म्हणाले, माझी खोड काढल्यावर काय होतं, ते तुलाही कळंल. जरा थांब. आज मी जास्त बोलणार नाही. मला सगळंचं बोलायचं आहे. मला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा मी बोलेन. राज्य पातळीवर काही लोकांशी मी बोलतो. त्यांनी मला सांगितलंय, त्याच्याकडं लक्ष देऊ नका. त्याला बोलायचं ते बोलू द्या. तुम्हाला आणि तुम्ही केलेल्या कामाला आमच्याकडून कधी ना कधी तरी प्रतिसाद नक्की मिळेल, एवढंच त्यांनी मला सांगितले आहे.
‘अरं ह्यांना (रणजितसिंह निंबाळकर) वाय दर्जाची सुरक्षा,’ असं म्हणत रामराजेंनी डोक्यावर हात मारून घेतला. ते म्हणाले, मला धमक्या येतात, त्यामुळे सुरक्षा मला मिळायला पाहिजे. पण, मी आपला फिरतोय गाडीत. काय चाललंय कळंना झालंय. पहिल्यांदा या सद्गृहस्थाला आर. आर. पाटील यांनी सुरक्षा दिली. तेव्हा ते तर विरोधातच होते. कुठल्या पक्षात होते, ते त्यांचं त्यांनाच माहिती. आता ती वाढत वाढत गेली. अख्ख फलटण तालुक्याचं पोलिस दलच त्याच्या मागं फिरू द्या. पण लोक काय करतील ते त्यांना कळू द्या.
मी मॅच बघत होतो, रमी बघत नव्हतो
मला आज कार्यक्रमाला येण्याचा मूड नव्हता; कारण मी आज मॅच बघत होतो. मी काय रमी बघत नव्हतो, मॅचच बघत होतो. आता त्यांच्यावर आपण जे बोलतो आहोत, ते माझे वैयक्तीक मित्र आहेत. त्यांना काही मला बोलायचं नाही, असे सांगून रामराजेंनी माणिकराव कोकाटेंवर जादा बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.