Abhijit Patil, Sharad Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur politics : अभिजीत पाटलांचं ठरलं : मेच्या दुसऱ्या आठवड्यात पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Abhijit Patil, Sharad Pawar News : अभिजीत पाटील हे सध्या कोणत्याच पक्षात नाहीत.

भारत नागणे

Pandharpur News : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे व भगीरथ भालके या दोन नेत्यांनी साथ सोडल्यानंतर आता अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात विठ्ठल साखर कारखान्यावरील एका कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण दिले जाणार आहे. या कार्यक्रमात पाटील हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लिटमस चाचणी ठरलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारकांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत परिचारक गटाने मोठ्या मतांच्या फरकाने ही निवडणुक जिंकली. तर अभिजीत पाटील गटाच्या उमेदवारांना अपेक्षित मते न मिळाल्याने पाटील गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांनी पाटील गटाला साथ न देता त्यांनी विरोधी परिचारक गटाला सहकार्य केल्याने पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

तर दुसरीकडे अभिजीत पाटील यांनी आता राजकीय भूमिका घेण्याची गरज असल्याचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. अभिजीत पाटील हे सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेनेचे सरकार असल्याने भाजप नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी ही त्यांचे निकटचे संबंध आहेत. अलिकडेच शरद पवार यांनी विठ्ठल साखर कारखान्याला बयोगॅस निर्मितीचा प्रकल्प दिला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शरद पवार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विठ्ठलवर येणार असल्याची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अभिजीत पाटील यांनी परिचारक गटाच्या विरोधात कडवी लढत दिली. या निवडणुकीमध्ये कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांनी शेवटपर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी परिचारक गटाला सहकार्य केल्याचे निकाला नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर आता विठ्ठल परिवाराला राजकीय ताकद मिळावी यासाठी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करावा अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

शनिवारी (ता.29) अभिजीत पाटील यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी अभिजीत पाटील यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असतानाही काळे-भालके यांनी विरोधी उमेदवारांना मतदान केल्याचा आरोप केला. भोसले यांच्या आरोपानंतर आता अभिजीत पाटील हे लवकरच राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पवार यांच्याशी त्यांचे असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही पाटील गटाची तयारी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.

याबाबत विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशा विषयी आताच कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार यांनी व्हीएसआयच्या माध्यमातून विठ्ठल कारखान्याला बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प दिला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण दिले आहे. मात्र, त्यांची तारीख मिळाली नाही. विरोधकांनी जाणूनबुजून चर्चा सुरु केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT