Sangli Zilla Parishad sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZPतही भाजपचा करेक्ट कार्यक्रम ठरला होता; वरिष्ठ नेत्यानेच दिली कबुली!

सांगली महापालिकेत भाजपची आधीच नाचक्की झाली होती.

सरकारनामा ब्यूरो

सांगली : सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती बदलाचा निर्णय घेतला असता; तर कदाचित आता तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) अध्यक्ष, उपाध्यक्ष असता, असा धक्कादायक खुलासा भाजपच्याच (BJP) वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तशी फिल्डिंग लावली गेली होती. त्याची खात्री झाल्यानेच बदल लांबणीवर टाकला गेल्याचे कारण आता सांगितले जात आहे. बदलासाठी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी अधिक आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, तो विषय संपला आहे.

भाजप कोअर कमिटीतील एका वरिष्ठ नेत्याने अध्यक्ष बदल का टाळला, याचे कारण स्पष्ट केले. जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारीत होण्याच अंदाज आहे. त्या तोंडावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला असता. सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली असती. सांगली महापालिकेत भाजपची आधीच नाचक्की झाली होती. जिल्हा परिषदेतही तोंडावर पडावे लागले असते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच अभ्यास करून, समोरील चालींवर लक्ष ठेवून त्यानुसार धोरण आखावे लागले, असा खुलासा त्या नेत्यांनी केला.

महापालिकेत महापौर निवडीत भाजपला झटका बसल्याने जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाचा विषय मागे पडला होता. दिलेला शब्द पाळला पाहिजे, अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली होती. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यासाठी गळ घातली होती. विषय पटवून दिला होता, मात्र त्यावेळी कोअर कमिटीतील अनेक नेत्यांनी गणित जमत नाही आणि महापालिकेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे सांगितले होते, असे त्या नेत्याने सांगितले.

तीच भूमिका अखेरपर्यंत कायम ठेवली. खासदार पाटील यांच्या दबावतंत्रामुळे राजीनामा घेतला गेला. मात्र, तो सादर केले गेला नाही. बँकेची निवडणूक लागल्यानंतर तो विषय मागे पडत गेला आणि अखेर आता त्यावर पडदा पडला आहे. मात्र, भाजपने अशी भूमिका का घेतली, हो-हो म्हणत नाही का झाले, पक्षाच्या धोरणातील धरसोडपणा कशासाठी, असे प्रश्‍न उपस्थित होत होते. त्यावर भाजप नेत्याने धक्कादायक खुलासा करत राष्ट्रवादीच्या खेळीवर आणि सोबतच पक्षांतर्गत कुरघोड्यांवरही निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT