Karad, 17 March : कऱ्हाड पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती आणि उपसभापतिपदी भाजपच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी महिलांनाच दोन्ही पदावर संधी दिली आहे. भाजपचे एकही मत फुटू नये, यासाठी भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या काळजीमुळे त्यांनी विरोधी गटाचा करेक्ट कार्यक्रम केला. पंचायत समितीच्या उंचीला शोभणारे काम करण्याची संधी यानिमित्ताने भाजपला मिळाली आहे. पंचायत समितीच्या सत्तासंघर्षात बाजी मारल्यानंतर तालुक्यात विधायक कामातून प्रतिमा निर्माण करण्याचे मोठे चॅलेंज भाजपपुढे असणार आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड (Karad) तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १२ गट आणि पंचायत समितीच्या २४ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल दिला. तालुक्यात पहिल्यांदाच भाजपला १२ पैकी आठ गटांत, तर पंचायत समितीच्या २४ पैकी १३ गणांत पसंती मिळाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला चार, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन, कॉंग्रेसला दोन आणि शिवसेना शिंदे गटाला दोन जागा मिळाल्या, त्यामुळे पंचायत समितीवर भाजपने (BJP) पहिल्यांदाच ऐतिहासिक सत्तांतर घडवून एकहाती सत्ता काबीज केली.
कऱ्हाड दक्षिणमधील विंग गणाच्या भाजपच्या नंदा यादव यांची सभापतिपदी, तर उपसभापतिपदी कऱ्हाड उत्तरमधील वाघेरी गणातील भाजपच्या अनिता वेताळ यांची निवड झाली आहे. पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने सत्तेचा झेंडा रोवला असून सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे भाजपच्या महिला नेत्यांकडे गेल्याने स्थानिक राजकारणात महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
आमदार डॉ. भोसले आणि आमदार घोरपडे यांच्या रणनीतीमुळे हे सत्तांतर शक्य झाले. मात्र सत्ता मिळविण्याइतकीच महत्त्वाची आता त्या सत्तेची कामगिरी ठरणार आहे. पंचायत समितीत भाजपसमोर विकासकामांची खरी कसोटी उभी राहणार आहे. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपने या निवडणुकीत अधिक शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध भूमिका घेतल्याचे दिसून आले.
सभापती-उपसभापती या दोन्ही पदांवर महिलांना संधी देत भाजपने राजकीय संदेश देण्याचाही प्रयत्न केला आहे. महिला नेतृत्वाला पुढे आणण्याची भूमिका यामागे असल्याचे पक्षाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या निवडीमागे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची रणनीती महत्त्वाची ठरली. पक्षाचे एकही मत फुटू नये यासाठी नेत्यांनी विशेष काळजी घेतली. परिणामी विरोधी गटाच्या संभाव्य राजकीय डावपेचांनाही त्यांनी प्रभावीपणे उत्तर दिले. या शिस्तबद्ध रणनीतीमुळेच भाजपने पंचायत समितीवरील सत्ता निर्विवादपणे आपल्या बाजूने खेचून आणली. मात्र सत्तास्थापनेनंतरची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे.
पंचायत समिती ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते. गावपातळीवरील पायाभूत सुविधा, शेतीविकास, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतील अनेक योजना पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात. त्यामुळे या संस्थेच्या कामकाजातूनच सत्ताधाऱ्यांची प्रतिमा घडत असते. भाजपने पहिल्यांदाच पंचायत समितीची सत्ता मिळवली असली तरी मतदारांच्या अपेक्षाही त्याच प्रमाणात वाढल्या आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करताना विकासकामांना गती देणे आणि पंचायत समितीची कार्यक्षमता वाढवणे हे भाजपसमोर मोठे आव्हान असेल.
विशेषतः तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक ठरणार आहे. एकीकडे ऐतिहासिक सत्तांतराचा आनंद असला तरी दुसरीकडे या सत्तेला विकासाची जोड देण्याची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून विधायक कामगिरी करून जनतेचा विश्वास टिकवणे हीच आता भाजपच्या नव्या नेतृत्वासमोरील खरी राजकीय कसोटी ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.