Uday Shelke
Uday Shelke  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्हा बँकेला लागलेल्या आगीवर उदय शेळके म्हणाले...

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला काल ( शुक्रवारी ) सायंकाळी आग लागली. या आगीत जिल्हा सहकारी बँकेतील लेखा परीक्षण विभागातील सर्व कागदपत्रे जळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी आज सकाळी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी पत्रकारांशी संवाद साधून घटनेबाबत माहिती दिली. ( Uday Shelke said on the fire at Nagar District Bank ... )

अॅड. उदय शेळके म्हणाले, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा- साडेसहा वाजता जिल्हा बँकेतील लेखा परीक्षण विभागाला शॉर्क सर्किटमुळे आग लागली. त्यात आमचे दोन-तीन संगणक, काही कागदपत्रे व फर्निचरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग वेळेतच अटोक्यात आली. लेखा परीक्षण विभागाचे जे काही कागदपत्रे जळाली असतील त्याच्या प्रती इतर ठिकाणीही आम्ही साठवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजात काही अडचणी येणार नाहीत. शिवाय त्या कागदपत्रांच्या इतर कॉपीही इतर शाखांत असतात त्यामुळे अडचणी येणार नाहीत.

ते पुढे म्हणाले की, ही इमारत 1970च्या दशकात बांधलेली आहे. बँकेचे उपाध्यक्ष व आम्ही निर्णय घेतला आहे की या इमारतीचे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे. त्यात काही दोष असतील तर ते आम्ही सुधारून घेऊ. या पुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही याची दक्षता घेऊ, असे उदय शेळके यांनी सांगितले.

राज्यातील साखर कारखान्यांच्या स्थिती बाबत बोलताना ते म्हणाले, ब्राझील देश हा साखर उत्पादनात प्रथम क्रमांकावर होता. मात्र यंदाच्या वर्षी तेथे साखर उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील साखरेला प्रचंड मागणी वाढली आहे. या वाढलेल्या मागणीमुळे साखर कारखान्यांना आर्थिक फायदा होते आहे. परिणामी जिल्हा बँकेलाही आर्थिक फायदा होत आहे. साखर कारखान्यांकडून कर्ज परतफेड वाढली असल्याची माहिती, अॅड. उदय शेळके यांनी दिली.

या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संचालक प्रशांत गायकवाड आदी उपस्थित होते.

कर्डिलेंचा उल्लेख टाळला

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला आग लागताच घटनास्थळी सर्वसंचालकांच्या आधी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले पोचले. बँकेतील आग विझविण्यासाठी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मदतीने एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आगी बाबत माहिती देताना बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी मात्र कर्डिले यांचा कुठेही उल्लेख केला नाही. उदय शेळके हे मुंबईत वास्तव्यास असतात त्यामुळे त्यांना घटनास्थळी झटपट येणे शक्य झाले नाही. मात्र आज सकाळी त्यांनी घटनास्थळाची केली. आग वझवण्यासाठी फवारलेले पाणी व धुराचा वास सहकार सभागृहातही पोचला असल्याने तेथेही आर्थिक नुकसान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT