सातारा : सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली की लुंगी लावण्यासारखे काहीतरी ते करत आहेत. एकुणच नगरपालिकेच्या विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्याचा हा प्रकार आहे. गाणी लावून, लुंगी लावून फिरून गेल्या पाच वर्षाचे अपयश या लुंगीत लपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी सडेतोड टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंच्या लुंगी घालून धरलेल्या ठेक्यावर केली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी काल रात्री साताऱ्यातील पोवई नाक्यावरील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर लुंगी लावून जात सेल्फी काढली. काही दिवसांपूर्वी या कामावर उदयनराजेंनी टीकाही केली होती. त्यानंतर सेल्फी काढल्यानंतर उदयनराजेंनी अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा' या सिनेमातील गाण्यावर ठेका धरला तसेच आपल्या नेहमीच्या स्टाईलने कॉलरही उडवली. उदयनराजेंच्या भूमिकेवर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज सडेतोड टीका केली आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सातारा शहरात आम्ही काहीतरी काम या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून उभे केले आहे. त्या कामाच्या प्रेमात ते पडलेत, याचा आनंद आहे. प्रेमात पडेल असे एकही काम त्यांच्याकडे नाही. पण, गंमत अशी की राजकीय लोकांना फॅन्सी ड्रोस पार्टी करावी लगात आहे. हा जरी गंमतीचा भाग असला तरी सातारा पालिकेची निवडणूक आली की लुंगी लावण्यासारखे काही तरी करत आहेत. आणखी किती पिक्चर येणार आहेत, याची मला माहिती नाही. पण, सातारा नगरपालिकेच्या विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेण्याचा हा प्रकार आहे.
कुठं गाणी लावून फिर, कुठ लुंगी लावून फिर... गेल्या पाच वर्षाचे अपयश या लुंगीत लपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यामुळे सातारकरांनी केवळ मनोरंजन म्हणून त्याकडे पहावे आणि हा विषय सोडून द्यावा. आगामी काही दिवसांत ज्यावेळी निवडणूका येतील. त्यावेळी अनेक डायलॉग, अनेक लुंगी लावून फिरणे असू देत, आणखी काही तरी सातारकरांना पहायला मिळणार आहेत. पालिकेतील त्यांचे नगरसेवक व नेत्यांना आता सातारकरांनी ओळखले आहे. आता उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला घरी पोचविण्याचे काम सातारकर करतील, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.