Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंचा गौप्यस्फोट : माझ्या मतदारसंघातही मतदान रद्द करण्याचा काहींचा प्रयत्न

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा बँकेत काहीजण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकिल देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी केला. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीवरून मतदार सभासदांची बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले असते तर जास्त संयुक्तिक झाले असते, असा खोचक टोला ही त्यांनी लागावला.

गोडोली येथील कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांना कर्ज मिळावे, त्यातून त्यांची प्रगती कशी होईल, यासाठी जे कोणी निवडून जाणार आहेत, त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजेत. काही वेळेस नको ती लोक आपण निवडून देतो आणि बँक किंवा संबंधित संस्थेचे खासगीकरण झालेले पाहायला मिळते. सहकारी संस्था मोडीस काढल्या जातात. आपले नशीब चांगले आहे, की सातारा जिल्हा बँकेचे कामकाज उत्कृष्ट प्रकारचे आहे.

अलिकडे बँकेत मतांचे राजकारण सुरू आहे. गृहनिर्माण असेल दुग्ध विकास, पाणीपुरवठा मतदारसंघ असेल, येथील मतदारांचा मतांचा अधिकार रद्द कसा होईल यासाठी काहीजण प्रयत्न करतात. मुळात सभासदांनी मतदान कोणाला कारायचे हा त्यांचा अधिकार आहे. पण मलाच करा, यालाच करा, असे बंधन केले जाते. बँक एका उंचीवर राहावी, बँकेला गालबोट लागू नये, याचा विचार झाला पाहिजे. मतदारांनी मतदान करू नये यासाठी काहीजण प्रयत्न करतात. माझ्या मतदारसंघातही असाच प्रयत्न झाला होता. पण, आम्ही वकिल देऊन त्या मतदारांच अधिकार कायम ठेवला. त्यामुळे सभासदांनी संचालकांना निवडून देताना संबंधित संचालकांमुळे किती संस्था मोडकळीस निघाल्या हे लक्षात घ्यावे. मगच त्यांना निवडून द्यायचे की नाही, हे ठरवावे.

राष्ट्रवादीच्या पुण्यातील बैठकीविषयी उदयनराजे म्हणाले, बैठक आहे हे मला वृत्तपत्रातील बातमीवरून समजले. कोणाला निमंत्रण होते, कोणाला नाही हे मला माहित नाही. पण, निमंत्रण सगळ्यांना द्यायला हवे होते. मुळात सभासदांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी साधक बाधक चर्चा करायला हवी होती. यामध्ये उदयनराजेंना निवडून द्याये का नाही, असे विचारायला हवे होते. पण काहीजण स्वतःचा गाढा पुढे रेटत आहेत. जे मतदान करणार आहेत, त्या सभासदांचे मत जाणून घ्यायला हवे होते. त्यासाठी बैठक बोलावली असती तर जास्त संयुक्तिक ठरले असते. पण, कदाचित या मतांशी अनेकजण सहमत नसतील. पण प्रत्येक वेळी मीच पाहिजे, अशी भूमिका काहींची असते. त्यामुळे येत्या २५ तारखेला उमदेवारी अर्जाची अखेरची तारीख आहे. त्यानंतर ठरेल काय करायचे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT