Omraje Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Omraje Nimbalkar : पवारांनी सांगितलं म्हणून उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये सगळंच मान्य केलं नाही : ओमराजेंनी उलगडली महाआघाडी स्थापनेवेळीची गोष्ट!

Mahavikas Aghadi News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणतेही कारण न देता युती तोडून टाकली होती. तिथूनच शिवसेना आणि भाजपमध्ये फारकतीला सुरुवात झाली होती.

सरकारनामा ब्यूरो

प्रभूलिंग वारशेट्टी

Solapur, 14 June : राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली. त्यावेळी केवळ ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही सगळे मान्य केले नाही. भाजपने 2014 मध्ये कोणतेही कारण न देता युती तोडली होती, त्यामुळे आमच्या शिवसेना पक्षाच्या हिताचा विचार करूनच महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. तो निर्णय बरोबर होता, असा दावा धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.

खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणतेही कारण न देता युती तोडून टाकली होती. तिथूनच शिवसेना आणि भाजपमध्ये फारकतीला सुरुवात झाली होती. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीवेळी पन्नास टक्के सत्ता वाटपचा फॉर्म्युला फेटाळण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

महाविकास आघाडी अस्तित्वात येताना केवळ शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी सांगितले; म्हणून आम्ही सगळे मान्य केले असे नाही. आमच्या पक्षाच्या हिताचा विचार करून उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय हा बरोबर होता, असे सांगून उध्दव ठाकरेंच्या महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या निर्णयाचे समर्थनही निंबाळकर यांनी केले.

दरम्यान, महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव अंतिम केले होते. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते. केवळ शरद पवार यांनी काहीतरी विचार करूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असेल, या विचारानेच त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्याचा दावाही निंबाळकर यांनी केला.

निवडणुका लढवण्यासाठी मला तरी पैसे लागत नाहीत, असे सांगून कार्यकर्त्यांना फ्लेक्सवर नाही, तर प्रत्यक्ष कामावर भर देण्याची सूचना असते. निवडणुकीची तयारी रोजच असल्याचे सांगत त्यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढविणार आहोत, असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

खासदार ओमराजे म्हणाले, माझे आजोबा आणि माझे वडील यांच्यात लोकांची सेवा करण्याचा भाव ओतप्रोत भरलेला होता. आजोबा भेटायला आलेल्यांना स्वत: उठून पाणी द्यायचे. सेवाभाव हा घरचा संस्कार असल्यानेच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचा गुण आपसुकच अंगी आला. आजही मला पवनराजेंचा मुलगा म्हणून ओळखतात, यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT