Viksit Bharat Sankalp Yatra Sarkarna
पश्चिम महाराष्ट्र

Viksit Bharat Sankalp Yatra: 'मोदी सरकार खोडा अन् मगच गावात या...'; साताऱ्यात 'संकल्प रथ'च रोखला

Vishal Patil

Satara News: केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा' काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुघी आणि खंडाळ्यातील पिसाळवाडी येथे संकल्प यात्रा आली असता, ग्रामस्थांनी मोदी सरकार नावावर आक्षेप घेतला. पहिल्यांदा मोदी सरकार खोडा अन् मगच गावात योजनाची माहिती सांगायला यावे, अशी भूमिका गावातील काही लोकांनी घेतल्याने अधिकाऱ्यांसोबत काहीकाळ शाब्दीक चकमक झाली.  

केंद्र सरकारच्या विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत. सरकारच्या योजना कोणा एका व्यक्तीच्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी संकल्प यात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव स्वयंसेवकांना झाकायला लावले. दुघी गावात घडलेल्या या प्रकाराची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होऊ लागली आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पिसाळवाडी येथेही घडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रथावर हे असं का लिहिलंय, हे आम्ही विचारू शकत नाही का?, असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला. पैसा जनतेचा आणि जाहिरात मोदी, भाजपाची का करत आहात. लोकांनी संकल्प यात्रेचा रथच गावातून बाहेर काढला.

'विकसित भारत संकल्प यात्रा' हा एक सरकारी उपक्रम असून आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी इत्यादी केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कोल्हापूरनंतर रत्नागिरी आणि आता सातारा जिल्ह्यात मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेत नागरिक आक्रमक होताना दिसत आहेत. तेव्हा आतातरी मोदी सरकार ऐवजी भारत सरकार असे लिहिले जाणार का ? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

सातारा जिल्ह्यात '15 संकल्प रथ'

मोदी सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांची व केलेल्या कामांची माहिती सातारा जिल्ह्यातील गावोगावी पोहचवण्यासाठी जवळपास पंधरा संकल्प रथ तयार करण्यात आले असून ते जिल्ह्यातील विविध भागात फिरत आहेत.

संकल्प यात्रेचा रथ कोरेगाव तालुक्यातील दुघी गावात जाताच ग्रामस्थांनी रथावरील मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोदी सरकार खोडा आणि मगच गावात या म्हणत मोदी सरकारच्या संकल्प रथाची दुघी गावातील ग्रामस्थांनी हकालपट्टी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT