FRP movement
FRP movement Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत एकरकमी एफआरपीसाठी आंदोलनाला हिंसक वळण

सरकारनामा ब्युरो

सांगली : सांगली (Sangali) जिल्ह्यात एक रकमी वाजवी आणि फायदेशीर किंमत (Fair & Remunerative Price) च्या आंदोलन दिवसेंदिवस अधिकच हिंसक वळणावर पोहचले आहे. गुरुवारी (११ नोव्हेंबर ) उशिरा रात्री ऊस वाहतूक करणारे राजारामबापू आणि क्रांती या कारखान्याचे ट्रॅक्टर पेटविण्यात आले. तर विश्वास कारखान्याच्या ट्रॅक्टरही पेटविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatna) अधिकच आक्रमक झाली आहे.

राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आहेत. तर क्रांती कारखान्याचे आमदार अरुण लाड तर विश्वास कारखान्याचे मानसिंग नाईक अध्यक्ष आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथे राजारामबापू कारखान्याचा ट्रॅक्टर येथे पेटविण्यात आला. तर कडेगाव तालुक्यात बळवडी फाट्यानजीक क्रांती कारखान्याचा ट्रॅक्टर पेटवला. विश्वास कारखान्याचा ट्रॅक्टरही तांदुळवाडीत पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या घटनांमुळेच आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्याची मागणी केली होती. या मागणीला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातही दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करत एक रकमी एफआरपी जाहीर केली. सांगलीतील दत्त इंडिया आणि दालमिया या दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी जाहीर केली, तर अन्य दोन कारखानेही एफआरपी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.

मात्र राजारामबापू, क्रांती आणि विश्वास कारखाना हे तीन कारखाने अद्याप कोणतीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यामुळेच स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष माजला आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतकरी आंदोलकांनी बुधवारी (१० नोव्हेंबर) राजाराम बापू कारखान्याच्या 35 वाहनाची हवा सोडली. तर त्यापूर्वी तासगाव तालुक्यात कुमठे फाटा, कडेगाव तालुक्यात रामपूर फाटा याठिकाणीही वाहनाची हवा सोडली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठ्प्प झाली आहे.

तर याच एक रकमी एफआरपीसाठी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दोन वेळा सर्व कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली. इतके करुनही प्रशासन काहीही पावले उचलत नसल्यामुळे हे आंदोलन हिंसक वळणावर पोहचले असून ते अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी याबाबत आपली भुमिका मांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला जे जमते ते सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना का जमत नाही, असा सवाल त्यांनी विचारला आहे. दोन्ही जिल्ह्यात किती अंतर आहे त्या ठिकाणी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली. सांगली जिल्ह्यात फक्त खासगी दोन कारखान्यांनी एक रकमी एफआरपी जाहीर केली.

दत्त इंडिया आणि दालमिया हे दोन्ही कारखाने केवळ पाच वर्षांपासून चालविले जात आहेत. पण सहकारातील 15 ते 25 वर्षे सुरू असलेले कारखाने शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आणि शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच पेटवा पेटवी सुरू आहे आमचे कार्यकर्ते ना इलाजाने हे करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचा अंत न बघता कारखान्यांनी तात्काळ एक रकमी एफआरपी जाहीर करावी, अन्यथा.... ' असे म्हणत त्यांनी कारखानदारांना इशाराही दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT