Ahmednagar
Ahmednagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्ह्यात होणार पाण्यावरून आंदोलन : समन्यायी वाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - राज्यात मान्सून सक्रिय होत असतानाच अहमदनगर जिल्ह्यात मात्र समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुळा खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी पुनर्वाटपासह इतर प्रलंबित प्रश्नावर किसान सभा आक्रमक झाली आहे. किसान सभा मंगळवारी ( ता. 14 ) कोतूळ येथे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याची माहिती, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले ( Dr. Ajit Nawale ) यांनी दिली. ( Water agitation in Nagar district: The issue of equitable distribution is on the rise again )

डॉ. अजित नवले म्हणाले, मुळा खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी पुनर्वाटप करून अकोले विधानसभा मतदार संघातील आदिवासी व बिगर आदिवासी जनतेला शेती व पिण्यासाठी पाण्याचा रास्त वाटा द्या, हिरड्यांची सरकारी खरेदी सुरू करा, कोतुळ आंदोलनात मान्य केलेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडा, शेती व वस्तीसाठी वीज द्या या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मंगळवारी ( ता. 14 ) कोतूळ येथील मुख्य चौकात सत्याग्रह सुरू करण्यात येणार आहे.

पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याबाबत कोतूळ खोऱ्यात संघर्ष सुरू आहे. आंदोलक आपल्या परिसरातील जनतेची बाजू घेऊन संघर्ष करत आहेत. पिंपळगाव खांड धरणात साठलेले ओंजळभर पाणी वाटण्यावरून परिसरात तणाव आहे. मुळा धरणाच्यावर हरिश्चंद्र गडाच्या पायथ्यापर्यंत पाण्याचा साठा अत्यल्प आहे. मुळा खोऱ्यातील सर्व पाणी मुळा धरणात प्रामुख्याने साठवण्यात येऊन मुळा धरणाच्या खाली शेतीला व शहरांना हे पाणी पुरवले जात आहे. खोऱ्यातील बहुतांश पाणी मुळा धरणात साठवल्यामुळे मुळा धरणाच्या वरील भागातील अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत.

प्रवरा खोऱ्यात पाणी पुनर्वाटपाची ऐतिहासिक लढाई झाली व त्यामुळे अकोले तालुक्यात प्रवरेच्या पाण्याचे पुनर्वाटप करून पाण्याचा हक्क मिळाला. निळवंडे धरणाच्या बाबतही निळवंडेत अकोल्याचा वाटा किती यावरून संघर्ष झाला व उच्चस्तरीय कालव्याची निर्मिती करुन अकोले तालुक्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी यशस्वी लढा देण्यात आला. मुळा खोऱ्यात मात्र अशी मूलभूत लढाई अद्याप झालेली नाही. पिंपळगाव खांड धरणात साठलेल्या अत्यल्प पाण्यात वाटा मागण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाला व्यापक करण्याची आवश्यकता आहे.

मुळा धरण बांधले म्हणजे धरणाच्या वरील भागातील आदिवासी व बिगर आदिवासी सर्व शेतकऱ्यांना पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित ठेवण्याचा कायदा झाला असे होत नाही. राज्यात समन्यायी पाणीवाटपाचे धोरण असल्यामुळे अन्यायकारक पद्धतीने मुळा खोऱ्याचे झालेले पाणी वाटप दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मुळा धरणाच्यावर हरिश्चंद्रगडापर्यंत ठिकठिकाणी पाणी साठवण्याच्या साईट्स उपलब्ध आहेत. मात्र केवळ पाणी उपलब्ध नाही हे कारण सांगून येथील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. किसान सभेच्या आंदोलनात या मूलभूत मुद्द्याला केंद्रस्थानी आणण्यासाठी किसान सभा आग्रही असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आहेत मागण्या

पाणी प्रश्ना बरोबरच आदिवासी भागात सरकारी हिरडा खरेदी तातडीने सुरू करावी, तोलार खिंड फोडून परिसराला मुंबई बाजारपेठेशी जोडावे, निराधारांना 21 हजाराच्या आत उत्पन्न दाखले द्यावेत, पिंपळगाव खांड, फोपसंडी व कोतूळ परिसरातील वाड्या-वस्त्यांचे बंद पाडण्यात आलेले रस्ते तातडीने खुले करून त्यांचे मजबुतीकरण व दुरुस्तीकरण करावे यासारख्या मागण्यांबाबत या आंदोलनात आवाज उठवण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT