Babaraje Deshmukh-Girish Mahajan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Girish Mahajan On Mohite Patil : गिरीश महाजनांचे मोठे विधान : मोहिते पाटलांना सोडून अकलूजमध्ये बदल होऊ शकतो, यावर आमचा विश्वास नव्हता

Babaraje Deshmukh Join BJP : बाबाराजे देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे माळशिरस तालुक्यात राजकीय बदल शक्य असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगत भाजपचे काम मोठ्या प्रमाणात उभे राहत असल्याचा दावा केला आहे.

सुनील राऊत
  1. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी बाबाराजे देशमुख व त्यांच्या परिवाराच्या भाजप प्रवेशामुळे माळशिरस-अकलूज भागात मोठा राजकीय बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला.

  2. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नसून कर्तृत्वावर कार्यकर्ता मोठा होतो, असे सांगत महाजन यांनी मोदींचे उदाहरण दिले.

  3. बाबाराजे देशमुख, राम सातपुते व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या प्रवेशामुळे भाजपला आगामी निवडणुकांत मोठी ताकद मिळेल, असे मत व्यक्त केले.

Solapur, 27 December : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांना सहकाराचा मोठा अनुभव आहे. देशमुख कुटुंबाचे सर्व क्षेत्रात योगदान आहे. त्याचा भाजपला फायदा होणार आहे. मोहिते पाटलांना सोडून येथे बदल होऊ शकतो, यावर आमचा पूर्वी विश्वास नव्हता. मात्र भाजपचे काम येथे मोठ्या प्रमाणात उभा राहत आहे, असे विधान जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नातेपुते येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख व त्यांचा संपूर्ण परिवार,कार्यकर्ते तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील, हिंदुराव माने पाटील, सुजय माने पाटील, पांडुरंग भाऊ देशमुख, धनंजय देशमुख व वेळापूर, अकलूज परिसरातील माने पाटील, देशमुख कुटुंबीय यांनी आज भाजपत प्रवेश केला. त्या कार्यक्रमात महाजन बोलत होते. भाजपकडून अकलूजच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेल्यर पूजा कोतमीरे, जामनेरचे संजय गरुड व बाळासाहेब सूर्यवंशी पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ते म्हणाले, घराणेशाही आता मावळायला लागली आहे. भाजपमध्ये स्वकर्तृत्वाने कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. बाबाराजे देशमुख आणि परिवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमुळे भाजपला भविष्यात फायदा होणार आहे.

भाजपमध्ये कर्तृत्वाने कार्यकर्ता मोठा होतो. चहा विकणारे मोदी आज पंतप्रधान आहेत. काँग्रेस, उबाठा व राष्ट्रवादीत घराणेशाही आहे. ‘नीरा देवघर’चे उर्वरित काम लवकरच सुरू होईल, ती जबाबदारी आमची आहे. रेल्वेप्रश्नही लवकरच मार्गी लागेल. भाजप आपल्या सर्वांसोबत आहे, असा शब्दही महाजन यांनी दिली.

या समारंभास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, राजन पाटील, प्रकाश पाटील, हनुमंतराव सूळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, राजकुमार पाटील, आप्पासाहेब देशमुख व इतर उपस्थित होते.

बाबाराजे देशमुख म्हणाले, मी १९८० पासून मोहिते पाटलांचे निष्ठेने काम केले. मात्र, यापुढे भाजपचे काम निष्ठेने करणार आहे. भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांनी माझे स्वागत केले आहे. या सर्वांच्या सोबत राहून हातात हात घालून मी भाजपचे काम करणार आहे.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले, अकलूजला पूर्वी विरोधी पक्षाला बूथवर एजंटसुद्धा मिळत नसे. आज नगरपालिका निवडणुकीत आमच्या उमेदवारांनी दहा हजार मते मिळवली आहेत. चार नगरसेवक विजयी झाले आहेत, तर ७ नगरसेवक अल्पमताने पराभूत झाले आहेत. ४१ टक्के मते आम्ही अकलूजमध्ये मिळवली आहेत. बाबाराजे देशमुख यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला ताकद मिळणार आहे".

माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, ‘नीरा देवघरचे पाणी येणार आहे. लोणंद-पंढरपूर रेल्वेचे काम लवकर सुरू होऊन भूमिपूजन होणार आहे. माळशिरसची गुलामगिरीची परंपरा घालवण्यासाठी राम सातपुते लढत आहेत. त्याचा मला अभिमान वाटतो.

येथील नेत्यांनी कारखाना, पतसंस्था बुडवलेल्या आहेत. एमआयडीसी, मेडिकल कॉलेज यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने राम सातपुतेंना ताकद द्यावी, ते संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ भाजपमय करतील. आगामी 2029 च्या निवडणुकीत तुम्हाला या भागात परिवर्तन नक्की दिसेल.

Q1. बाबाराजे देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर गिरीश महाजन काय म्हणाले?
त्यांच्या अनुभवामुळे भाजपला फायदा होईल आणि मोहिते पाटलांना सोडूनही येथे बदल शक्य असल्याचे महाजन म्हणाले.

Q2. या कार्यक्रमात भाजपची कोणती भूमिका अधोरेखित करण्यात आली?
भाजपमध्ये घराणेशाही नसून कर्तृत्वावर कार्यकर्ता मोठा होतो, हे अधोरेखित करण्यात आले.

Q3. बाबाराजे देशमुख यांनी भाजप प्रवेशाबाबत काय भूमिका घेतली?
१९८० पासून मोहिते पाटलांसोबत काम केल्यानंतर आता भाजपचे काम निष्ठेने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Q4. अकलूज नगरपालिकेतील भाजपची कामगिरी काय सांगते?
भाजपने ४१ टक्के मते मिळवत चार नगरसेवक निवडून आणून आपली ताकद सिद्ध केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT