Rashmi Bagal
Rashmi Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

‘आदिनाथ’मधील चुकांची शिक्षा मिळाली...आमची आमदारकी, ZP अन्‌ पंचायत समितीही गेली!

आण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : ‘‘आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath Sugar factory) माध्यमातून बागल गटाचे राजकीय खच्चीकरण करण्याचे काम कायम विरोधकांनी केले, अजूनही ते सुरूच आहे. ‘आदिनाथ’च्या बाबत झालेल्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद गेली. विधानसभेला आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र,  कोणत्याही परिस्थितीत आगामी २०२२-२३ च्या हंगामात आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आदिनाथ चालवण्याची आशा आम्ही सोडली नाही,’’ असे बागल गटाच्या नेत्या तथा आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल (Rashmi Bagal) यांनी सांगितले. (We strive to start Adinath Sugar factory next season: Rashmi Bagal)

बागल गटाच्या कार्यालयात गुरुवारी (ता. ७ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत रश्मी बागल बोलत होत्या . या वेळी रश्मी बागल यांनी   माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. बागल म्हणाल्या की, आदिनाथ हा कायमच राजकरणाचा बळी ठरलेला करखाना आहे. विरोधकांनी आदिनाथच्या माध्यमातून कायम आम्हाला टार्गेट केले आहे. आदिनाथ कारखाना १२८ कोटींच्या कर्जासाठी भाडेतत्त्वावर द्यावा लागतोय, याचे दुःख आम्हालाही आहे. त्यात कारखान्याकडे ९० कोटींची साखर असताना हा कारखाना देण्याची वेळ यावी हेही खेदजनक आहे.

रश्मी बागल म्हणाल्या की, आदिनाथ कारखान्याच्या बाबतीत झालेल्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद गेली. विधानसभेला पराभवाला आम्हाला सामोरे जावे लागले. भले राजकारण काहीही होत राहील; मात्र आदिनाथ कारखाना सुरू झाला पाहिजे. आदिनाथ कारखान्याभोवती कुणीही राजकारण आणू नये , अशी मी विनंती करते आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने  एक रूपया मानधनावर काम करतो, असा बचाव समितीचे   हरिदास डांगे यांचा प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही. सह्याचे अधिकार संचालक मंडळ सोडून कुणाला देता येत नाहीत. याची डांगे यांनाही कल्पना आहे, असे रश्मी बागल यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT