Pandharpur News : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेलेले भगीरथ भालके हे विधानसभेला कसे निवडून येतात, तेच आम्ही बघतो, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आज पंढरपुरात दिला. (We will see how Bhagirath Bhalke is elected to the Legislative Assembly : Umesh Patil )
भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या बीआरएस पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (NCP) प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी (ता. २६ जून) पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे उद्या मंगळवारी (ता. २७ जून) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस या पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी जाणार नसल्याचा दावाही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे.
भगीरथ भालके हे विधानसभेसाठी लागणाऱ्या खर्चाच्या यंत्रसामुग्रीच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून बीआरएस पक्षात गेले आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट, राष्ट्रवादी जोमाने काम करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार (स्व.) भारत भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात उभा केलेला विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनीही भगीरथ भालके यांची साथ सोडल्याचे यावेळी दिसून आले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु भगीरथ भालके हे कसे निवडून येतात, तेही आम्हाला आता बघायचे आहे, असाही इशारा उमेश पाटील यांनी दिला आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरा साठे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर काखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, अनिता पवार, नागेश फाटे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.