Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ranjitsinh Naik Nimbalkar, Jaykumar Gore  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पडद्यामागं असं काय घडलं की खासदार निंबाळकर आणि आमदार गोरेंनी माघार घेतली...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणित सर्वसमावेशक पॅनेलची घोषणा माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण, आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी दोघांनी ही आपल्या समर्थकांसह अनपेक्षितरित्या उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सस्पेन्सच संपला. त्यांनी ऐन निवडणुकीतून माघार का घेतली, याची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागली असून येत्या दोन दिवसांत ते याबाबतचे स्पष्टीकरण देणार आहेत.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना खासदार उदयनराजे भोसले व आमदार जयकुमार गोरे यांची सर्वाधिक भिती वाटत होते. ही मंडळी एकत्र येऊन राष्ट्रवादीला आव्हान देऊ शकतील, अशी आशा सर्वांनाच होती. त्यानुसार उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या काही समर्थकांसह शासकिय विश्रामगृहातून चालत येत शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेल टाकणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत या दोन्ही नेत्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तसेच खासदार उदयनराजेंना होणारा विरोधाचा फायदा घेऊन त्यांना भाजपच्या पॅनेलमध्ये घेण्याबाबतही चर्चा केली नाही. यासोबतच राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे नाराज असलेली मंडळींमध्ये ॲड. उदयसिंह पाटील, प्रभाकर घार्गे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ही मंडळी भाजप प्रणित पॅनेलच्या संपर्कात जातील असेही वाटले होते. पण तशी कोणतीच प्रक्रिया किंवा हालचाल झाली नाही. आमदार गोरे व खासदार निंबाळकर हे दोघेही अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत शांत राहिले. त्यांनी साधी टीका सुध्दा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली नाही. आज अर्जाच्या अखेरच्या दिवशी दोन्ही नेते जिल्हा बँकेत आले व त्यांनी आपल्यासह आपल्या समर्थकांचे इतर मतदार संघातून दाखल केलेले अर्ज मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुखद धक्काच बसला.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, राजेंद्र राजपुरे यांची खलबते आज जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सुरू होती. त्यांना गोरे, निंबाळकरांनी आपल्या समर्थकांचे अर्ज मागे घेतल्याचे समजताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदा दिसु लागला. राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणित पॅनेल होणार नाही, याची खात्री झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण, आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार का घेतली, याची उत्सुकता जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह जनतेलाही लागली आहे. येत्या दोन दिवसांत आमदार जयकुमार गोरे हे याबाबतचे विश्लेषण करून आपली भूमिका मांडणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT