Narayan Patil-Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politic's : संजय शिंदे अजितदादांना भेटायला गेल्यावर नेमकं काय घडलं?; आमदार नारायण पाटलांचा खळबळजनक आरोप

Adinath Sugar Factory Election : भविष्य काळात त्यांनी करमाळा तालुक्यात येण्याची तलफ केली नाही पाहिजे, असा पराभव त्यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करा. त्यांना त्यांच्या माढा तालुक्यात काय करायचे आहे, ते करू द्या. आजपर्यंत त्यांनी जेवढं केले आहे, तेवढं दोघांनाही (संजय शिंदे आणि बबन शिंदे) फेडायची वेळ आली आहे, हे लक्षात असू द्या,

Vijaykumar Dudhale

Karmala, 11 April : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली म्हणून ते अजितदादांकडे गेले आणि तिथं फोटो काढून आणले. सांगायाला लागले की आम्हाला अजितदादांचा पाठिंबा आहे. पण, अजितदादांचा तुम्हाला पाठिंबा होता, तर तुम्ही अपक्ष निवडणुकीला का उभं राहिलात? तुम्ही त्यांच्या पक्षांचं तिकिट का घेतलं नाही? खरं सांगायचं तर अजितदादांनी त्यांना हाकलून लावलंय आणि ते सांगतात की अजितदादांचा आम्हाला पाठिंबा आहे. पण, अजित पवारांनी त्यांना हाकलून दिलं, ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर केला.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Adinath Sugar Factory Election) प्रचारात आमदार पाटील बोलत होते. त्या वेळी त्यांनी माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर आरोप केला आहे. ते म्हणाले, संजय शिंदे हे निवडून आले असते, तर सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून गुडघ्यावर आणलं असतं. पण, दैवतालासुद्धा त्यांचं मान्य झालं नाही; म्हणून त्यांना घरी बसावं लागलं.

भविष्य काळात त्यांनी करमाळा तालुक्यात येण्याची तलफ केली नाही पाहिजे, असा पराभव त्यांचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करा. त्यांना त्यांच्या माढा तालुक्यात काय करायचे आहे, ते करू द्या. आजपर्यंत त्यांनी जेवढं केले आहे, तेवढं दोघांनाही (संजय शिंदे (Sanjay Shinde) आणि बबन शिंदे) फेडायची वेळ आली आहे, हे लक्षात असू द्या, असे आवाहन केले.

ते म्हणाले, जवळपास दोनशे दोनशे आणि तीनशे तीनशे कोटी रुपये त्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी काढून ठेवले होते. पण, त्यांना करमाळा आणि माढा या दोन्ही मतदारसंघात अपयश आलं आहे. कारण पाप जास्त झालं की कुठंतरी घडा पालथा होतो. तसा त्यांचा घडा पालथा झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता कारखाना सांभाळण्याची कुवत राहिलेली नाही. त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. अलीबाबा आणि चाळीस चोरांची ही टोळी आहे.

मी सर्वसमान्य घरातून आलेला सर्वसामान्य आमदार आहे. तुमच्या विश्वासाला पात्र राहून काम करेन. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा गोविंदबापू पाटील यांची अस्मिता असल्याचे दाखवून देईल. या निवडणुकीत सर्वांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्या ताब्यात द्यावा, आम्ही तो सुरळीत चालू करून दाखवू, असे आवाहनही आमदार नारायण पाटील यांनी केले.

नारायण पाटील म्हणाले, आमच्या पॅनेलमधील सर्व कार्यकर्ते हे सुशिक्षित आणि काम करणारे लोक आहेत. आम्ही नव्या रक्ताला वाव दिला आहे. या तरुण रक्ताला काम करण्याची संधी द्यावी, असे अवाहन करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT