nyandev Ranjane, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शशिकांत शिंदेंना धूळ चारणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

जिल्हा बँक निवडणूकीत शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून त्यांचे विरोधक ज्ञानदेव रांजणे यांना २५ तर शशिकांत शिंदे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे शिंदे यांचा एका मताने पराभव झाला आहे. या पराभवानंतर ज्ञानदेव रांजणे हे नाव जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पण हे ज्ञानदेव रांजणे नेमके आहेत तरी कोण?

ज्ञानदेव रांजणे हे मुळचे जावळी तालुक्यातील आंबेघर गावचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे या देखील जावळीतील कुसुंबी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तसे बघितले तर जिल्ह्याच्या राजकारणात रांजणे दाम्पत्य हे काहीसे नवखे. पण मागच्या पाच वर्षांपासून जावळीतील राजकारणात सक्रिय राहिले आहेत. रांजणे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असले तरी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे ते कट्टर समर्थक आहेत.

मागच्या अनेक दिवसांपासून रांजणे यांनी निवडणूकीची तयारी केली असल्यामुळे त्यांनी शिंदेंसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे सुरुवातीपासून शिंदे यांना ही निवडणूक जड जाणार व रांजणे यांच्या बाजूने एकतर्फी होणार अशी अटकळ बांधली जात होती. त्यातच दिड महिन्यापासून जावळीतील बहुतांशी मतदार हे सहलीवर गेल्याने शिंदे यांची खऱ्या अर्थाने गोची झाली. रांजणे यांच्या विजयासाठी वसंतराव मानकुमरे, जयदीप शिंदे, हणमंतराव पार्टे यांनी सहलीवरील मतदारांचे करेक्ट नियोजन केले होते.

आमदार शिंदे यांना बिनविरोध करण्यासाठी रांजणे यांनी माघार घ्यावी, यासाठी उपमुख्ममंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. पण रांजणे यांनी माझ्याकडे मतदार असताना मी माघार का घ्यावी? असा प्रतिप्रश्न केला होता. अगदी मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांनी रांजणेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेरपर्यंत माघार न घेता रांजणे यांनी लढण्याचा निर्णय घेतला होता.

आमदार शिंदे यांनीही आपले राजकीय डावपेच दाखवून देत निकाल फिरवण्यापर्यंत मजल मारली, मात्र त्यात त्यांना अपयश आले. केवळ एक मताने त्याना पराभव स्वीकार करावा लागला. एकूण ४९ मतदार असल्याने विजयासाठी २५ हा मॅजिक आकडा गाठणे गरजेचे होते. त्यात आमदार शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे याना २५ मते मिळाली. या निकालानंतर ज्ञानदेव रांजणे यांनी पहिल्यांदा शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आणि आजचा विजय हा जावळीतील सर्वसामान्य जनता, माझे दैवत आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि पक्षाचे नेते अजित पवार यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT