Ajit Pawar, Kirit Somayya
Ajit Pawar, Kirit Somayya sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण; अजित पवारांनी उत्तर द्यावे....

राजेंद्र वाघ

कोरेगाव : कारखान्यांची पळवा पळवी करून लपवा छपवी करण्याचे काम पवार परिवार करत आहे, असा आरोप करत जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण? या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले. या कारखान्यासंदर्भातील गैरव्यवहार बाहेर येणारच आहे. जरंडेश्वर कारखाना बंद पाडला जाणार असल्याचा अपप्रचार केला जात असून, ही राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी आहे. हा कारखाना बंद होणार नाही, हा विश्वास ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व ऊस तोडणी यंत्रणेने बाळगावा, असेही श्री. सोमय्या म्हणाले.

चिमणगांव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिल येथे आज किरीट सोमय्या यांनी भेट दिली. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संस्थापक संचालक मंडळातील सदस्यांनी श्री. सोमय्या यांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव भोसले, दत्तात्रय धुमाळ, प्रकाश आबा फाळके, अविनाश फाळके, भगवान फाळके, लिला जाधव, किसनराव घाडगे यांनी जरंडेश्वर कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याची विनंती श्री. सोमय्या यांना केली.

या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर श्री. सोमय्या म्हणाले, "या कारखान्याच्या संस्थापक, संचालकांनी माझी तीन वेळा भेट घेतली आहे. त्यांच्या विनंतीवरुन त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मी येथे आलो आहे. बेनामी पद्धतीने हा कारखाना घेतला आहे. त्याचा मालक कोण? याची कथा तयार केली, तर पिक्चर तयार होईल. यापूर्वी केंद्रात, राज्यात तुमची सत्ता होती. आजारी कारखान्यांना मदत करणे तुमचे काम होते. मग हा कारखाना बंद कसा पडला? आता न्यायालयाच्या आदेशाने या कारखान्याची चौकशी सुरू आहे. जरंडेश्वरसह पाच कारखान्यांची माहिती मी घेत आहे.

'जरंडेश्वर' सहकारी होता, आता जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड झाला आहे. हा शेतकऱ्यांचाच कारखाना आहे, असे वाटावे, म्हणून नावामध्ये जरंडेश्वर शब्द ठेवला आहे. सामान्यांना कर्ज मिळवताना त्यांच्या सात पिढ्या जातात, तुम्हाला सात तासांमध्ये ८५ कोटींचे कर्ज कसे मिळाले? लवकरच हा घोटाळा समोर येणार आहे. मी पाच टप्प्यांत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप मूळ मालक सापडला नाही. गुरू कमोडिटीचा मालक सध्या जेलमध्ये आहे. उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्याची रेषा पवार परिवारापर्यंत पोचणार आहे.

अजित पवारांची नजर 'किसन वीर' वर...

गुरू कमोडिटीची बेनामी सिद्ध झाली, तशी पवार परिवाराचीही सिद्ध होणार आहे. शेतकरी राजाच बेनाम झाला आहे." किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या एक हजार कोटींच्या कर्जाविषयीच्या प्रश्नावर आणि 'सोमय्या यांना जरंडेश्वर दिसतोय, किसन वीर कारखाना दिसत नाही', या अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात 'आता अजित पवार यांची नजर किसन वीर कारखान्यावर गेली आहे का? असा प्रतिप्रश्न करत श्री. सोमय्या यांनी थेट बोलणे टाळून कोणत्याही कारखान्यासंदर्भात पुरावे दिल्यास पक्ष न पाहता मी तेथे जाईन, असे सांगितले. दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाने श्री. सोमय्या यांच्या स्वागताची तयारी केली होती, प्रवेशद्वाराच्या आत अधिकारी पुष्पगुच्छ घेऊन थांबले होते; परंतु श्री. सोमय्या यांनी प्रवेशद्वाराबाहेरच तेथे जमलेल्या उपस्थितांशी संवाद साधून ते निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT