Satara, 21 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत ९९ टक्के मतदान झाले आहे, त्यामुळे गुलाल कोण उधळणार याची चर्चा जोरात रंगली आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवार हे सातारा जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे गुलालाची उधळण साताऱ्यातच होणार आहे. मात्र, तो माणचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप की खटावमधील महायुतीमधील भाजपचे धैर्यशील कदम?, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
सांगली सातारा विधान परिषदेची निवडणूक भाजपकडून धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप लढवत आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडी आणि सांगलीतील महाविकास आघाडीच्या भरभक्कम नेतृत्वामुळे राष्ट्रवादीचे जगताप हे चमत्कार घडवतील की काय, अशी चर्चा रंगली होती.
मतदानाला एक दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाने युतीधर्म पाळून भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे धैर्यशील कदम आणि त्यांच्यासाठी पक्षात खिंड लढवणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण वरिष्ठ पातळीवरून झालेल्या निर्णयामुळे महायुती एकसंघ राहिली आणि तुलनेने कदम यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार हे माण आणि खटाव एकाच विधानसभा मतदारसंघातील आहेत. म्हणजेच कदम आणि जगताप यांच्यापैकी कोणीही निवडून आले तरी माण आणि खटावला आणखी एक आमदार मिळणार आहे.
सांगली-सातारा मतदारसंघात ८९५ पैकी ८९४ जणांचे मतदान झाले आहे. यात सातारा जिल्ह्यात १०० टक्के, तर सांगली जिल्ह्यातील विटा मतदान केंद्र वगळता उर्वरीत केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले आहे. विटा केंद्रावर खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक आईच्या निधनामुळे मतदान करू शकले नाहीत, त्यामुळे या मतदारसंघात केवळ एका नगरसेवकाचे मतदान सोडता शंभर टक्के मतदान झाले आहे.
धैर्यशील कदम हे सातारा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असून त्यांनी कऱ्हाड उत्तरमधून दोन वेळा विधानसभा लढवली आहे. त्यांच्या तिकिटासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आग्रह होता, त्यामुळे ते यंदा गुलाल उधळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अभयसिंह जगताप हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर अनुयायी आहेत. त्यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा लढविण्याची तयारी केली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचीही निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीतही त्यांचा निसटता पराभव झाला होता, त्यामुळे या वेळी तरी जगताप गुलाल उधळणार का, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
म्हणजेच कदम किंवा जगताप यांच्यापैकी कोणीही जिंकले तरी माण-खटावची आमदारकी निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे निवडून आले आहेत, त्यानंतर विधान परिषदेची आमदारकीही या मतदारसंघात येणार, हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.