Ajit pawar, shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवेंद्रसिंहराजेंची विनंती अजित पवार स्वीकारणार की धुडकावणार...

अजित पवार Ajit Pawar यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Nimbalkar व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasahen Patil यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितले आहे.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष पदावरुन सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच मागील वेळी बॅंक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मुंबई मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच मागील पंचवार्षिकमध्ये सर्वांना बरोबर घेऊन बॅंक चालवली आहे. त्यामुळे यावेळेस पुन्हा अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी श्री. पवार यांच्यापुढे मांडली. यासंदर्भात आपण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलतो, असा शब्द श्री. पवार यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्ष पदावर संधी मिळावी म्हणून काही संचालकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यामध्ये वाईचे नेते नितीन लक्ष्मणराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत.

मागील पाच वर्षे सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांचीही अपेक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून आहेत. काहींनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन आगामी नगरपंचायत, पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती व आगामी निवडणुकीत कोणती रणनिती वापरायची याविषयी चर्चा करुन सल्ला घेतला आहे.

तसेच आज दुपारी दोन, अडीचच्या सुमारास सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत बॅंकेचे संचालक अनिल देसाई उपस्थित होते. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी मी बॅंकेच्या अध्यक्ष पदावर आगामी काळातही काम करण्यास इच्छुक असून मागील वेळी सर्वांना सोबत घेऊन बॅंकेचे कामकाज चांगल्या पध्दतीने केले आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी अजित पवार यांनी यासंदर्भात मी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलून ठरवतो, असे सांगितले आहे. तसेच बॅंक आगामी काळात चांगल्या प्रकारे चालवा, केवळ कारखान्यांनाच कर्ज देऊन बॅंक मोठी होणार नाही, इतर संस्थांनाही कर्ज पुरवठा करण्याबाबतचे धोरण घ्यावे. तसेच आगामी काळातही बॅंक सर्वांनी मिळून एकत्र कामकाज करुन चांगल्या प्रकारे चालवा, अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष पदाच्या रेसमध्ये आतापर्यंत नितीन पाटील उघडपणे पुढे आले होते, आता शिवेंद्रसिंहराजेंनीही श्री. पवार यांची भेट घेऊन मागणी केल्याने या पदाच्या निवडीतील चुरस वाढली आहे. अजित पवार कोणाचे नाव निश्चित करणार की खासदार शरद पवारांशी चर्चा करुन राष्ट्रवादीतील संचालकाचे नाव सूचवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT