Hasan mushrif
Hasan mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सतेज पाटलांच्या मदतीने मुश्रीफांनी जमीन लाटली : ताराराणी आघाडीचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी रमणमळा रि. स. नं. ८७५ या क्षेत्रातील १५ गुंठे जमीन त्यांचे चिरंजीव साजिद मुश्रीफ यांच्या नावे विकसन करारपत्र व वटमुख्त्यार पत्र करून घेतली आहे. कोल्हापुरातील महापालिका सत्तेचा गैरवापर करुन हसन मुश्रीफ यांनी पालिकेच्या मालकीची जमीन संगनमताने लाटली आहे. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर लगतचा ९ मीटर रस्ता आणि खुली जागाही गिळकृंत केली आहे, असा आरोप माजी महापौर सुनील कदम आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. कोल्हापुरातील मुश्रीफांच्या ‘आदर्श’ला ‘सतेज किनार’ असल्याचेही त्यांनी सांगितले. (With the help of Satej Patil, Hasan Mushrif scammed the land in Kolhapur)

कोल्हापुरात रि. स. नं. ८७४ ला लागून रि.स.नं. ८७५ हे क्षेत्र असून यातील पश्चिमेला तसेच दक्षिणेला ८७५ ही मिळकत आहे. रि. स.नं. ८७४ च्या दक्षिणेकडील बाजूस जयसिंग घोरपडे यांच्या मालकीचे ८१ गुंठे इतके क्षेत्र होते. त्याचा १९८१ मध्ये फायनल लेआऊट झाला आहे. या क्षेत्राबाबत घोरपडे यांनी नागरी जमीन कमाल धारण कायद्याखाली विवरण पत्र भरले आहे. त्यानुसार केवळ ३ गुंठे इतके क्षेत्र उदयसिंह घोरपडे यांच्या नावे अतिरिक्त दिसत आहे. घोरपडे यांनी या मिळकतीतील क्षेत्र विक्री केले आहे. तसेच, अतिरिक्त क्षेत्र सरकार जमा आहे. त्यांच्या ७/१२ पत्रकी कोणतेही क्षेत्र शिल्लक दिसत नाही. ८७५ या क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीच्या १५ गुंठे जमिनीवर आजमितीस कल्पतरू नावाची बहुमजली इमारत उभारली असून या बहुमतांशी सर्व सदनिका या साजिद हसन मुश्रीफ यांच्या नावे आहेत. लगतचा ९ मीटर रस्ता आणि खुली जागाही गिळकृंत केली आहे, असा आरोप कदम यांनी केला आहे.

सतेज पाटील यांचे मूक समर्थन

मुश्रीफ यांनी सत्तेचा गैरवापर करत महापालिकेच्या मालकीची कोट्यवधींची जमीन बळकावली आहे. ओपन स्पेसमध्ये कोट्यवधी रुपयांची इमारत बांधली आहे, असा कदम यांचा आरोप आहे. या सर्व प्रकरणात रि.स.नं. ८७४ या मिळकतीमध्ये ड्रिम वर्ल्ड वॉटर पार्क या नावाने ज्ञानशांती ही कंपनी भाडेतत्वाने व्यवसाय करत होती. या कंपनीचे संचालक भागीदार सतेज पाटील व यांचे कुटुंबीय होते. पण, त्यांच्यापैकी कोणीही सामाजिक भान ठेवत त्यांच्या ताब्यातील मिळकत ही बळकावली जात असताना साधी तक्रारदेखील केली नाही. उलटपक्षी मूक समर्थन देऊन सहकार्यच केले, असे कदम यांनी सांगितले.

मुश्रीफांनी आमच्याविरोधात बदनामीचा दावा दाखल करावा

राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमच्यावर या आरोपासाठी बदनामीचा दावा दाखल करावा, या दाव्याची नोटीस आम्ही स्वतः स्वीकारु, असे आव्हानही माजी महापौर सुनील कदम आणि ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, कोल्हापूर महापालिकेचे प्रशासक कादंबरी बलकवडे यांना याबाबत विचारले असते, त्यांनी सांगितले की याबाबत नगररचना विभागातील कागदपत्रे तपासूनच त्यावर प्रतिक्रिया देण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT