सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघातात 4 तरुणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी या महिला पोलिसाने नवीन कारसोबत बर्थडे सेलिब्रेशन केले. या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, आता या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
कराडमधील कोल्हापूर नाका ते नंदलापूर उड्डाणपुलावर 31 ऑक्टोबरच्या रात्री हा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला पोलीस कर्मचारी पाटील आपल्या नवीन कारसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. या सेलिब्रेशनचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.
या व्हिडिओमध्ये संबंधित महिला पोलीस कर्मचारी कारच्या बोनेटवर केक कापताना दिसत आहे. तसेच नवीन कारच्या बोनेटवर बसून फोटो काढणे, हातात फुलांचा गुच्छ घेऊन पोझ देणे आणि पायरो गनमधून सोनेरी ठिणग्यांची आतषबाजी करत वाढदिवस साजरा केल्याचे दिसते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकारावर जोरदार टीका सुरू झाली.
या सेलिब्रेशनवर टीका होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे याच उड्डाणपुलावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. कोल्हापूरहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात होऊन 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे अपघातस्थळावर अशा प्रकारे जल्लोष केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
या व्हिडिओची चर्चा वाढल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रकरणाची दखल घेत संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, व्हिडिओवर टीका झाल्यानंतर संबंधित महिलेने आपले इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, कोल्हापूर नाका-नंदलापूर हा सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या मार्गावरील वेग आणि अपघातांचा प्रश्न याआधीही चर्चेत आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.