Nitesh Rane| Rohit Pawar|
Nitesh Rane| Rohit Pawar| 
पश्चिम महाराष्ट्र

तिथं तुमचं हिंदुत्व' जागृत होत नाही; राणेंच्या इशाऱ्याला रोहित पवारांचे उत्तर

सरकारनामा ब्युरो

कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात प्रतिक पवार या युवकावर गुरुवारी (४ ऑगस्ट) रात्री एका गटाने हल्ला केला होता.तर जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिकवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी हल्लेखोरांना थेट इशाराच दिला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्याने राजस्थानातील उदयपूरमध्ये एका हिंदूची हत्या करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील अमरावतीमध्येही एका हिंदूची हत्या करण्यात आली. शर्मा प्रकरण संपलेले असताना आता पुन्हा अहमदनगरमधील एका युवकावर हल्ला करण्यात आला. प्रतिक पवार असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणावर आमचे बारीक लक्ष आहे पण एकच सांगतो आता जर हिंदूंना टार्गेट केलं तर आम्ही जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक आणि ट्विटर पोस्टच्या माध्यमातून नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. ''सद्गुरू संतश्री गोदड महाराजांच्या कर्जतच्या भूमीत धार्मिक द्वेषाच्या घटना कधी घडल्या नाहीत व पुढंही घडणार नाहीत.कारण संतशिकवणीनुसार वागणारी माणसं इथं आहेत. त्यामुळं या भूमीबाबत प्रत्येकाने योग्य माहिती घेऊनच बोलावं. आमच्या भागातील सामाजिक सलोखा भंग करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.

भंडाऱ्यात अत्याचार झालेली महिला आज मृत्यूशी झुंज देतेय, परंतु याबाबत आवाज उठवायला 'आमचं हिंदुत्व' कधी जागृत होत नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'आमचा' तिसरा डोळा कधी उघडत नाही. पण राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मात्र आमचं हिंदुत्व जागृत होतं, हीच खरी शोकांतिका आहे.'' असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राणेंवर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT