Ahmednagar ZP
Ahmednagar ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शालेय पोषण आहारावरून जिल्हा परिषद सदस्य आक्रमक : शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणाले...

अमित आवारी

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक महिन्या भरावर आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील शेवटची सर्वसाधारण सभा आज ( शुक्रवारी ) ऑनलाईन घेण्यात आली. या सभेत भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी शालेय पोषण आहारातील मूग डाळ निकृष्ट असल्याचे सभेत दाखविले. यावरून जिल्हा परिषदेचे सदस्य शिक्षणाधिकाऱ्यांवर संतापले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवसेना स्टाईल कारवाईचा इशाराच दिला. ( Zilla Parishad members aggressive on school nutrition diet: told education officials ... )

जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख, कृषी व बांधकाम विभागाचे सभापती काशिनाथ दाते, समाजकल्याण सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण सभापती मिरा शेटे, माजी सभापती शरद नवले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, संदेश कार्ले, सीताराम राऊत, रामहरी कातोरे, हर्षदा काकडे, आदींसह जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्यांना अंधारात ठेवत निर्णय घेतात. तसेच चुकीची माहिती देतात, असा आरोप भाजपचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केला. तसेच सभा दोन-तीन दिवसांनी घेण्याची मागणी केली. या मागणीला अनेक सदस्यांनी सहमती दर्शविली. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षा घुले व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य केली नाही.

भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली बातमी दाखवत जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट आहे. विद्यार्थांना बसण्यासाठी शाळा खोल्याही व्यवस्थित नाही. शालेय पोषण आहारही निकृष्ट दर्जाचा आहे, असे सांगत त्यांनी शालेय पोषण आहारातील मूग डाळीची पिशवीच सभेत दाखविली. निकृष्ट शालेय पोषण आहार पाहून जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक झाले.

सीताराम राऊत, मिलिंद कानवडे यांनी निकृष्ट शालेय पोषण आहार देणाऱ्या संबंधित संस्थेची बिले थांबविण्याची मागणी केली. शिवसेनेचे गट नेते संदेश कार्ले अधिक आक्रमक झाले. शिक्षणाधिकाऱ्यांना यावर उत्तर देण्यास सांगितले मात्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून कोणतेही उत्तर आले नाही. यावर संतप्त झालेले संदेश कार्ले म्हणाले, मी तुम्हाला ठणकावून सांगतो. जालिंदर वाकचौरे यांनी सादर केलेल्या मूग डाळीचा दर्जा तपासायचा. जर संबंधिताला या कामाचे बिल गेले तर तुम्हाला ठोकणार. कायदा पाळणार नसाल तर कायदा हातात घ्यायला लावू नका, असा इशाराच कार्ले यांनी दिला.

या इशाऱ्यानंतर सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी संबंधित ठेकेदाराची बिले अदा करू नयेत अशी मागणी केली. त्यामुळे अहमदनगर जिल्हा परिषदेत शालेय पोषण आहारातील चक्की घोटाळ्यानंतर मूग घोटाळा पुढे येण्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT