kolhapur News: राज्यातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 च्या आधारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अभियोग्यता धारक उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे.
6 ऑगस्टपासून शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम जनरेट करून पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 11 ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली होती . मात्र पोर्टलवर वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने अनेक उमेदवारांना प्राधान्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून केली गेली मात्र दोनच दिवसांची 13 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. तरीही पोर्टल संथ सुरु आहे.
अनेकांना OTP येत नाही तर OTP आले तरी प्रधान्यक्रम जनरेट होत नाही, अजून दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती प्रक्रियांपैकी एक असलेल्या या भरतीकडे हजारो अभियोग्यता धारकांचे लक्ष लागले आहे.
TAIT 2025 च्या निकालाच्या आधारे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदांची भरती केली जात आहे. या भरतीमध्ये राज्यातील विविध जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधील सुमारे 30 हजारांहून अधिक शिक्षक पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
6 ऑगस्टपासून उमेदवारांना पवित्र पोर्टलवर लॉगिन करून उपलब्ध पदांनुसार प्राधान्यक्रम जनरेट करण्याची आणि त्यानंतर पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रक्रिया सुरू झाल्यापासूनच अनेक उमेदवारांना पोर्टलवर विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
काही उमेदवारांना OTP वेळेत प्राप्त होत नसल्याची, तर काहींना लॉगिन केल्यानंतरही पुढील प्रक्रिया करता येत नसल्याची तक्रार आहे. काही उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. वारंवार प्रयत्न करूनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक भरतीसाठी अनेक उमेदवारांनी TAIT परीक्षेत मेहनत घेऊन गुणवत्ता प्राप्त केली आहे. आता पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे जर एखाद्या उमेदवाराला निर्धारित वेळेत प्राधान्यक्रम नोंदविता आला नाही, तर त्याचा थेट परिणाम त्याच्या भरतीच्या संधीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रमाला अत्यंत महत्त्व असल्याने पोर्टलवरील तांत्रिक अडचणींची जबाबदारी उमेदवारांवर टाकता येणार नाही, अशी भूमिका अनेक उमेदवारांनी घेतली आहे. पोर्टल सुरळीतपणे चालत नसताना 13 ऑगस्ट ही अंतिम मुदत कायम ठेवणे अन्यायकारक ठरेल, अशी भावना उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.
मुदतवाढीसाठी उमेदवार आक्रमक
पवित्र पोर्टलवरील तांत्रिक समस्या तातडीने दूर करून प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी किमान काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. तसेच पोर्टलवर निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचे अधिकृत निराकरण करून उमेदवारांना स्पष्ट मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आहे.
उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, भरतीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर असल्याने शेवटच्या दिवसांत पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वीच तांत्रिक अडचणी दूर करून सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी असलेली मर्यादित मुदत यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष वाढत आहे. 13 ऑगस्टची मुदत वाढविण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काही उमेदवारांनी दिला आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी शासन व संबंधित यंत्रणेने उमेदवारांच्या अडचणींची तातडीने दखल घ्यावी. तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही गुणवत्ता धारक उमेदवारावर अन्याय होऊ नये, यासाठी प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी पुरेसा अतिरिक्त वेळ देण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. पवित्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर होऊन सर्व उमेदवारांना समान संधी मिळते का आणि प्राधान्यक्रमासाठी मुदतवाढ दिली जाते का, याकडे आता राज्यातील हजारो अभियोग्यता धारकांचे लक्ष लागले आहे.
“एकीकडे तब्बल दीड वर्षानंतर पवित्र पोर्टल सुरू झाले आहे आणि दुसरीकडे पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अवघे 5 ते 6 दिवस देण्यात आले होते. त्यातही सध्या पवित्र पोर्टल अत्यंत मंद गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक उमेदवारांना OTP मिळत नाही, तर काही उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. त्यामुळे दोन दिवसांची मुदत दिली होती मात्र अद्यापही या तांत्रिक अडचणी सुटलेल्या नाहीत त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे एखाद्या गुणवत्ताधारक उमेदवाराचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने पोर्टलमध्ये तांत्रिक सुधारणा कराव्यात. तसेच सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची मुदत वाढविण्यात यावी"
(राज्य समन्व्ययक, शिक्षणसेवक कृती समिती)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.