PM Kisan 22nd installment payment status Sarkarnama
महाराष्ट्र

PM Kisan Installment : PM किसान योजनेचा 22 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही? 'या' 5 कारणांमुळे थांबू शकतात तुमचे पैसे!

PM किसान योजनेचा 22 वा हप्ता खात्यात जमा न झाल्यास कारणे जाणून घ्या. ई-केवायसी, आधार व बँक समस्यांमुळे पैसे थांबू शकतात.

Rashmi Mane

PM Kisan payment issue : PM किसान योजनेचा 22 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या संभ्रम आहे. नवीन वर्ष 2026 सुरू होताच शेतकऱ्यांचे लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याकडे लागले आहे. मात्र काही महत्त्वाच्या कारणांमुळे हा हप्ता थांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे वेळेत माहिती अपडेट करणे अत्यंत गरजेचे ठरते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून 2019 मध्ये तिची सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या-मोठ्या खर्चासाठी ही रक्कम अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार ठरली आहे.

आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. सरकारी माहितीनुसार, 9 कोटींपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. हजारो कोटी रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

आता 22 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू आहे. अंदाजानुसार हा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होऊ शकतो. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मागील हप्त्यांचा कालावधी पाहता, साधारण चार महिन्यांच्या अंतराने हप्ता दिला जातो, त्यामुळे त्याच पद्धतीने पुढील हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही आहेत पाच कारणं

मात्र काही कारणांमुळे तुमचा 22 वा हप्ता अडकू शकतो. सर्वात पहिले कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसेल तर पैसे थांबू शकतात. दुसरे म्हणजे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर रक्कम जमा होत नाही. तिसरे कारण जमीन नोंदींमधील चूक किंवा अपूर्ण माहिती आहे. चौथे कारण म्हणजे बँक खात्यातील तपशील चुकीचे असणे. पाचवे आणि सध्या सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे फार्मर आयडी नसणे.

आता पीएम किसान योजनेसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून त्यामध्ये जमीन, पीक, उत्पन्न, पशुपालन यासंबंधी माहिती नोंदवलेली असते. फार्मर आयडी नसल्यास पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

पीएम किसान योजना आजही लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार आहे. त्यामुळे 22 वा हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती तपासून आवश्यक अपडेट वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT