Pooja Khedkar Vaibhav Kokat Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedkar News : एका ट्विटमुळे समोर आला पूजा खेडकरचा 'कार'नामा, देशभर गाजलेल्या UPSC स्कॅमचा भांडाफोड करणारा वैभव नेमका कोण आहे?

IAS Pooja Khedkar News Update : सोशल मीडियावरील रील्समुळे किंवा एखाद्या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे अनेकांची आयुष्य घडली आहेत, तशीच बिघडली देखील आहेत. याचाच एक उदाहरण म्हणजे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर.

Jagdish Patil

Pooja Khedkar News Update : सध्याच्या काळातील सोशल मीडिया हे असं माध्यम आहे, जे एखाद्याला रातोरात सेलिब्रिटी करु शकतं. एखाद्याला हिरो टू झिरो करु शकतं. अशी ताकद या माध्यमामध्ये आहे. सोशल मीडियावरील रील्समुळे किंवा एखाद्या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे अनेकांची आयुष्य घडली आहेत, तशीच बिघडली देखील आहेत. याचाच एक उदाहरण म्हणजे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर.

सध्या राज्यासह देशभर या पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा सुरु आहे. पूजासह आता तिच्या आई-वडिलांचे देखील अनेक घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. शिवाय पूजाची नोकरी देखील धोक्यात आली आहे. या प्रकरणाची केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) आणि पंतप्रधान कार्यालयाने देखील दखल घेतली आहे.

यूपीएससीने (UPSC) पूजावर गुन्हा दाखल करुन तुमची आयएएस रद्द का करु नये? असा प्रश्न विचारत नोटीस बजावली आहे. सध्या हे प्रकरण सर्वांना माहिती असलं तरी ते नेमकं समोर आलं कसं? याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र, येवढा मोठा घोटाळा बाहेर यायला एका तरुणाचं ट्विट कारणीभूत ठरलं आहे. वैभव कोकाट नावाच्या तरुणाने केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार समोर आला आहे.

वैभव (Vaibhav Kokat) याने 6 जुलै रोजी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये त्याने पूजा खेडकरने कारवर आवलेल्या अंबर दिव्याबाबतची माहिती दिली होती. शिवाय शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेल्यावर पूजाने अँटी चेंबर बळकावून वरिष्ठांच्या अँटी चेंबरमधील सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावल्याचं उघडकीस आणलं.

तसंच पूजाच्या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केल्याची माहिती देखील वैभवच्या या ट्विटमुळे उजेडात आली. त्यानंतर हे प्रकरण राज्यासह देशात चर्चेचा विषय बनलं.

तसंच आपणाला पूजा खेडकर कोण आहेत हे माहिती नव्हतं. मात्र, तिच्या संदर्भात पुणे (Pune) जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला. तो वाचल्यानंतर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माज कसा करु शकतो? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मी घेतल्याचं वैभवने म्हटलं आहे.

शिवाय पूजा खेडकर हिचा शोध घेताना तिने बेकायदा अंबर दिवा ऑडी कारवर लावल्याचं लक्षात आलं. त्याबाबतचे फोटोही मला मिळाले. ते पोलिसांना दिले असते तर कारवाईला फार उशीर झाला असता त्यामुळे मी थेट सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत पोस्ट केल्याचं वैभवने सांगितलं.

दरम्यान, आपण पूजा खेडकर बाबतची माहिती 'एक्स'वर टाकल्यानंतर ती प्रचंड व्हायरल झाली. प्रसारमाध्यमांनी त्या पोस्टची दखल घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी वैभवशी संपर्क केला. शिवाय या प्रकरणानंतर अनेक IAS अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरील आपली अकाऊंट डिलिट केली. त्यामुळे एका ट्विटमुळे आपण काय करु शकतो याचं ताज उदाहरण म्हणजे पूजा खेडकर प्रकरण असल्याचंही तो म्हणाला.

सध्या वैभव याने आणखी एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने या प्रकरणात आपणाला जी साथ मिळाली यामध्ये समाजमाध्यमाची ताकद खूप मोठी असल्याचं म्हटलं. शिवाय आपली लढाई कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून अशा लोकांचे एक मोठे रॅकेट असेल, त्या विरोधात असल्याचंही वैभवने स्पष्ट केलं आहे. तसंच आणखी एका ट्विटमध्ये त्यानं म्हटलं की, "व्यवस्थेविरोधात लिहा, बोला. व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिहिण्यात आहे." त्याच्या या सर्व ट्विटमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

वैभव कोकाट नेमका कोण आहे?

वैभव कोकाट हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. बीड जिल्ह्याचा रहिवासी असणाऱ्या वैभवला सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिहायला आवडतं. एक्सवर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे 31 हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT