Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

अजित पवारांच्या नंबरवरुन २० लाखांच्या खंडणीची मागणी : बिल्डरच्या तक्रारीने खळबळ

सरकारनामा ब्युरो

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाने आणि त्यांच्याच मोबाईल नंबरवरुन पुण्यातील एका बिल्डरकडे (extortion form builder) तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. "तुमचा प्रोजेक्ट आम्ही गावात होवू देणार नाही, अशी धमकी देत या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ६ जणांना अटक केली आहे.

याबाबत संबंधित बिल्डरने (extortion form builder) दाखल केलेल्या फिर्यादीवरुन (Pune Crime) मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपींनी प्ले स्टोअरवरून फेक कॉल ॲप या नावाचे अॅप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करून त्यावरून तक्रारदार बिल्डरला फोन केला. त्यांना आपण अजित पवार यांचे पीए चौबे बोलत असल्याचे भासवून हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडी येथील जागेचा वाद मिटवून टाका, तसेच गावात तुमचा प्रोजेक्ट होणार नाही अशी धमकी देण्यात आली. यानंतर संशयितांनी २० लाखांच्या खंडणीची मागणीही करण्यात आली.

याप्रकरणी, संबंधित बिल्डरने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgardern Police Station) तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तपास करत पोलिसांनी नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८), किरण रामभाऊ काकडे (वय २५), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९), आकाश शरद निकाळजे (वय २४) या ६ जणांना अटक केली. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 384, 386, 506, 34 आणि आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांपासून १३ जानेवारीपर्यंत हा संपुर्ण प्रकार सुरू होता.

ही कारवाई पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलिस अंमलदार अजय जाधव, अजय थोरात, अमोल पवार आदींनी केली. शैलेश संखे पुढील तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT