Ajit Ranade Appointment cancelled : पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. गोखले संस्थेचे कुलपती डॉ. बिबेक देबराय यांनी, डॉ. रानडे हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांना हटवण्याशिवाय पर्याय नव्हता. असं स्पष्टीकरण दिलं आहे.
आता यावर अनेक नामवंताकडून नाराजी व्यक्त होत आहे. हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी नुकसानदायक असल्याचंही शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलं आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत, केंद्राली मोदी सरकार आणि त्याचबरोबर राज्य सरकारलाही जाब विचारला आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) यासंदर्भात त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, 'सस्नेह जय महाराष्ट्र, गेले २ दिवस वर्तमानपत्रामंध्ये पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला, अशा पद्धतीने पदावरून हटवणं हे अत्यंत चुकीचं आहे.'
'बरं, त्यासाठी रानडे यांना दहा वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण पुढे केलं जात आहे. मग त्यांची नियुक्ती करताना, ही बाब लक्षात आली नव्हती का? अडीच वर्ष या पदावर राहून त्यांनी जी कामगिरी केली, त्यानंतर अचानक ही आठवण कशी होते ? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत, त्या त्या क्षेत्रातील अनुभवी माणसं पुढे अध्यापन क्षेत्रात येतात, आणि शिक्षकाला त्या व्यवस्थांमध्ये प्रचंड मानसन्मान असतो.'
याशिवाय, 'मी आत्ता अमेरिकेला गेलेलो असताना, तिथल्या अनेकांशी बोलताना, मला जाणवलं की अगदी नोबेल पुरस्कार विजेते, ते एखाद्या अवाढव्य उद्योग समूहात दीर्घकाळ उच्च पदावर काम केलेला, माणूस पुढे विद्यापीठांमध्ये शिकवतो. एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख होतो. तिथे त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, अनुभव, आणि त्या व्यक्तीची कार्यक्षमता हेच निकष बघितले जातात. 'अध्यापन अनुभव' असले काहीतरी फुटकळ निकष लावले जात नाहीत.'
'मुळात आपल्याकडचं शिक्षण हे व्यवसाय उद्योगांना पूरक नसतं. याला दोन कारणं मला नेहमी जाणवतात की अभ्यासक्रम तयार करणारे, हे त्या क्षेत्रांत काम केलेले असतातच असं नाही, आणि शिकवणारे पण त्या क्षेत्रातील अनुभवी नसतात. त्यामुळे मुलांना जे शिकवलं जातं, ते पुढे त्यांना बाहेर पडल्यावर उपयोगी पडत नाही आणि त्यांची मग ओढाताण सुरु होते, बेरोजगारांच्या फौजा तयार होतात.' असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
याचबरोबर 'आणि हे सगळं असताना डॉ. अजित रानडेंसारखी व्यक्ती स्वेच्छेने शिक्षण क्षेत्रांत उतरते, आणि अशा व्यक्तीला पूर्णपणे नाउमेद करणारी कृती सरकारकडून घडणार असेल, तर या क्षेत्रांत पुन्हा कुठला तज्ज्ञ आणि धडपड्या माणूस येईल? आणि अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का ?' असा थेट सवाल राज ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारला केला.
तसेच, 'जरी हा विषय थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसला तरी केंद्रातील सरकारकडे, राज्य सरकारने बोललं पाहिजे आणि यूजीसीने केलेली चूक सुधारलीच पाहिजे... शिक्षण क्षेत्रांत फार मूलभूत काम करणं जर शक्य नसेल तर किमान अशा गोष्टींतून चुकीचे पायंडे पडतील आणि समाजातील बुद्धिमान लोकं नाऊमेद होणार नाहीत इतकं तरी सरकारने पहावं...' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी या मुद्य्यावरून राज्य सरकारलाही धारेवर धरल्याचं दिसून येत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.