Raj Thackeray ratan tata. Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक गमावला' राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रिया!

Rashmi Mane

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात बुधवारी निधन झालं आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशाचं मोठं नुकसान झालं असून देशभरात शोककळा पसरली आहे. उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. "आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा 'कर्तृत्ववान तरीही निर्लेप राहिलेला उद्योजक' गमावला, हे त्याहून मोठं दुःख.'' असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत."रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं.

"माझे आणि रतन टाटांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध होते आणि मी एखादी कल्पना त्यांच्यापुढे मांडली आणि रतन टाटांनी त्याला प्रतिसाद दिला नाही असं कधीच झालं नाही. आम्ही मांडलेल्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना असोत की नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेच्या काळात उभारलेल्या 'बोटॅनिकल उद्याना'साठी सीएसआरमधून दिलेला निधी असो, त्यांचा माझ्याबद्दलचा आणि पक्षाबद्दलचा जिव्हाळा अनेकदा दिसून आला."

Ratan Tata

रतन टाटांचे श्वान प्रेम...

रतन टाटांची अजून एक गोष्ट मला प्रचंड आवडायची ती म्हणजे त्यांचं श्वान प्रेम. आमच्यातली ही एक समानता. ताज हॉटेल समूहाच्या परिसरात असू देत की 'बॉंबे हाऊस' हे टाटा समूहाचं मुख्यालय, तिथे भटक्या श्वानांची पण उत्तम काळजी घेतली जायची. रतन टाटांच्या श्वान प्रेमाबद्दलचा एक किस्सा मी एके ठिकाणी वाचला होता. रतन टाटांना त्यांच्या दातृत्वाचा गौरव करणारा एक खूप मोठा सन्मान लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता. पण अगदी ऐनवेळेला त्यांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला कारण त्यांच्याकडच्या 'टॅंगो' आणि 'टिटो' या दोन श्वानांपैकी एक, खूप आजारी होता. रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना कळवलं की अशा स्थितीत मी माझ्या श्वानांना सोडून येऊ शकत नाही. रतन टाटा माणूस म्हणून किती मोठे होते हे या उदाहरणातून जाणवतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT