Raj Thackeray expresses strong opposition to the state government's decision to make Hindi compulsory from Class 1, warning both Modi and Fadnavis. Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही! राज ठाकरेंनी दिला संघर्षाचा इशारा

Raj Thackeray Opposes Compulsory Hindi in Maharashtra Schools : राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट करून हिंदी धोरणाला विरोध केला आहे. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न राज्यात यशस्वी होऊ देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे.

Rajanand More

Mumbai News : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. या धोरणाला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला आहे. ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. मुद्दा ताणू नका, नाहीतर संघर्ष अटळ आहे, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे राज्याने माघार न घेतल्यास राज्य सरकार विरुध्द मनसे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

राज ठाकरेंनी सोशल मीडियात पोस्ट करून हिंदी धोरणाला विरोध केला आहे. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.  

तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

आम्ही हिंदी नाही!

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, असे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे, असा सज्जड दम ठाकरेंनी भरला आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुध्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील मराठीतर भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, अशी शंका ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

दुकानांमध्ये पुस्तकं विकू देणार नाही

बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारंच पेटून उठतील. बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे खपवून घेतली जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 

तर संघर्ष अटळ

उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का? नाही ना? मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये, असं माझं सरकारला आवाहन आहे. पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT