Congress News : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संग्राम थोपटे, जयश्री पाटील, कुणाल पाटील अशा अनेक दिग्गज घराण्यांतील वारसदारांनी भाजपची वाट धरली. पण अनेक दिवसांनंतर काँग्रेसला गुड न्यूज मिळाली आहे. महाराष्ट्रातील बड्या नेत्याने काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे अखेर निलंबन मागे घेण्यात आले आहे. मंगळवारी (1 जून) दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थित मुळक यांनी पक्षात प्रवेश केला.
विधानसभेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले होते. नागपूर जिल्ह्यातील एकही जागा काँग्रेसने सोडण्यास नकार दिला होता. मात्र रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात रामटेक आणि दक्षिण नागपूर या 2 विधानसभा मतदारसंघाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली होती.
यात दक्षिण नागपूर सोडून घेण्यास काँग्रेसला यश आले होते. मात्र रामेटक कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी भूमिका त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतली होती. विशाल बरबटे यांना उमेदवारीसुद्धा जाहीर केली होती. अखेर काँग्रेसला रामटेक मतदारसंघ सोडावा लागला.
मात्र राजेंद्र मुळक यांनी इथून बंडखोरी केली होती. सर्वांच्या आग्रहस्तावर आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता असा दावा मुळक यांनी केला होता. मुळक यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे, काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद सदस्य व इतर पदाधिकारीसोबत उपस्थित होते.
सुनील केदार यांनी तर जाहीर सभासुद्धा घेतल्या होत्या. त्यावरून महाविकास आघाडीत मोठे मतभेद उफाळून आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी ही गद्दारी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुळाकांना काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले होते.
या मतदारसंघात महायुतीचे आशिष जयस्वाल आणि राजेंद्र मुळक या दोघांमध्येच सामना रंगला होता. उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला फक्त साडेपाच हजार मते मिळाली होती. मुळक यांनी सुमारे 81 हजार मते घेतली होती. विशेष म्हणजे मुळक यापूर्वी उमरेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्य मंत्री होते. दरम्यान, या पक्षप्रवेशावर बोलताना मुळक म्हणाले, मी पक्ष सोडला नव्हता. पक्षाचे नेते आणि रामटेक मतदारसंघातील जनतेच्या आग्रहस्तव निवडणूक लढवली होती.
सर्व नेत्यांची मला साथा दिली होती. महाविकास आघाडीतून चुकीचा संदेश जाऊन नये यासाठी निलंबन करणे काँग्रेस नेत्यांना भाग पडले. मात्र निकालानंतर त्यांची चूक झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. मी काँग्रेसमध्येच कार्यरत होतो. पक्षाचे काम करीत होते. त्यामुळे घरवापसी झाल्याचे म्हणता येणार नाही अशी भावना राजेंद्र मुळक व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.