Rajya Geet controversy : राज्यगीताच्या मान-अपमानावरून भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संबंधित राजकीय वर्तुळात सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करत भाजपने ठाकरे बंधूंवर राज्यगीताचा अवमान केल्याचा आरोप केला. त्यानंतर मनसेने भाजपच्या टीकेला थेट प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
भाजप महाराष्ट्रने आपल्या एक्स अकाउंटवर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अमित ठाकरे यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते एकमेकांना भेटताना दिसत असून, पार्श्वभूमीवर राज्यगीत सुरू असल्याचे ऐकू येते.
या व्हिडिओवरून भाजपने (BJP) ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. 'जेन्युइनली, आज दोन्ही शहजादे उघडे पडले' अशा शब्दांत भाजपने टीका केली. तसेच, मराठीच्या नावावर राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून राज्यगीत सुरू असताना साधे एका जागी उभे राहण्याची तसदीही घेतली गेली नाही, असा आरोप भाजपने केला. राज्यगीताचा अपमान करूनही त्यांना आपली चूक लक्षात येत नाही, असा दावा करत भाजपने ठाकरे बंधूंवर 'चमकोगिरी' केल्याचा आरोपही केला.
भाजपच्या या टीकेनंतर मनसेनेही आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून प्रत्युत्तर दिले. 'भाजपचे भान आता पार सुटले आहे', अशा शब्दांत मनसेने भाजपवर निशाणा साधला. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. कुठल्याही मुद्द्यावरून राजकारण करणे आणि सतत रडकथा सांगणे एवढेच भाजपचे राजकारण उरले आहे, असा आरोप मनसेने केला.
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप महाराष्ट्राने आपल्या नेत्यांकडून इतिहासात अनावधानाने झालेल्या चुका दाखवायच्या ठरवल्या, तर अशा अनेक पोस्ट करता येतील, असा टोला मनसेने लगावला. 'काहीतरी सुमार मुद्द्यावरून राजकारण करणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण नाही,' असेही मनसेने म्हटले. मात्र, काही गोष्टींची आठवण करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ शेअर करत असल्याचे मनसेने स्पष्ट केले. 'विषय निघालेच तर खूप काही उकरून काढणे शक्य आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक आब आणि ठहराव आहे,' अशी टिप्पणी करत मनसेने भाजपला अप्रत्यक्ष इशाराही दिला.
राज्यगीताच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता सोशल मीडियावरील राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. भाजपने ठाकरे बंधूंच्या व्हिडिओचा आधार घेत मनसे आणि ठाकरे गटाला लक्ष्य केले, तर मनसेने भाजपच्या टीकेला पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ समोर ठेवून उत्तर दिले आहे. त्यामुळे राज्यगीताच्या मान-अपमानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडिया वॉर आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.